केज ( छत्रपती संभाजी नगर ) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपांखाली केजचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामुळे शिक्षण विभागाची मोठी नाचक्की झाली होती.
गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८:३० वाजता पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीसोबत केक आणण्यासाठी जात असताना, आरोपी लक्ष्मण बेडसकर याने त्यांना चहा- नाश्त्याच्या बहाण्याने त्याच्या चारचाकी गाडीत बसवले. त्यानंतर तो त्यांना धारूर चौकातून चिंचपूरच्या मारुती मंदिराच्या रस्त्याने कोल्हेवाडीकडे घेऊन गेला. कोल हेवाडी रस्त्यावर एका निर्जनस्थळी गाडी थांबवून बेडसकर याने त्या
अल्पवयीन मुलीच्या हाताला वाईट हेतूने स्पर्श करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरून गेलेल्या मुलीने आणि तिच्यासोबतच्या महिलेने आरडाअ-ओरडा सुरू केला. त्यामुळे संतप्त झालेल्या बेडसकर याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी मागून आलेल्या एका वाहनाच्या प्रकाशाने घाबरून तो आपली गाडी आणि मोबाईल तिथेच सोडून पळून गेला.
या घटनेनंतर, १९ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्याच दिवशी रात्री पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेडसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५०९/२०२५ अंतर्गत भारतीय दंड विधान (भादंवि) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखलट आहे.
बेडसकर यांचे एका महिलेसोबतचे अश्लील आणि लैंगिक संबंधांचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. लक्ष्मण बेडसकर यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरला आहे. त्याच्यावर यापूर्वी लाचलुचपत विभागाने (एसीबी) केलेल्या छाप्यात तो अडकलेला आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा डागाळली असून, समाजात या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.