A road blockade was staged at the Panpoi fata
कन्नड, पुढारी वृत्तसेवाः बारामती अॅग्रो साखर कारखान्याने उसाला प्रतिटन ३,९०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (दि. २२) पानपोई फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर साडेचार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रदेश कमिटी सदस्य तथा कृषिभूषण भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर कारखान्याने प्रतिटन ३,३११ रुपये पहिली उचल जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे व ज्येष्ठ नेते सुभाष पाटील सहभागी झाले. दानवे यांनी बारामती अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. त्यानंतर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद देशमुख यांनी ३,३११ रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले. रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
स्वाभिमानी संघटनेचे भाऊसाहेब थोरात, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे, जि. प. सदस्य डॉ. संजय गव्हाणे, कृष्णा साबळे, अड. दिनकर पवार, प्रकाश बोरसे, चंद्रकांत देशमुख, माजी उपसभापती एस बी अकोलकर, कृषीभूषण संतोष जाधव, प. स. सदस्य सिद्धेश्वर झाल्टे, संतोष करवंदे, अरविंद राठोड, रघुनाथ गायकवाड, किशोर पवार, सुनील बोडखे, पांडुरंग शिंदे, गुलाब मगर, दीपक शेजवळ अविनाश डगळे आदींची उपास्थिती होती.
कारखान्याने योग्य दर द्यावा : डॉ. गव्हाणे
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना उसाचा चांगला दर मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नव्या कारखान्याकडून चांगला दर दिला जात असेल, तर बारामती अॅग्रोनेही योग्य दर द्यावा. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय : थोरात
३,३११ रुपयांच्या पहिल्या उचलीवर शेतकरी समाधानी नसून, अधिक दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत लवकरच ऊस परिषद घेण्यात येणार आहे. आंदोलनामुळे कारखान्याला पहिली उचल जाहीर करावी लागली. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले.