Low price of onion : वीस क्विंटल कांद्याला फक्त २ हजारांची पट्टी file photo
छत्रपती संभाजीनगर

Onion prices fell : वीस क्विंटल कांद्याला फक्त २ हजारांची पट्टी

लासूर स्टेशन कांदा मार्केटसमोरील शेतकऱ्यांचे आंदोलन आश्वासनानंतर मागे

पुढारी वृत्तसेवा

A receipt of just ₹2,000 for 20 quintals of onions

लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील शेतकऱ्याने लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेल्या २० क्विंटल कांद्याला बुधवारी प्रतिक्विटल अवघा १०० रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. २० क्विटल कांद्याची केवळ २ हजार रुपयांची पट्टी बनल्याने शेतकऱ्यांनी थेट मार्केटच्या गेटसमोर ट्रॅक्टरमधील कांदा रस्त्यावर ओतून भर उन्हात त्यावर उभे राहत निषेध आंदोलन केले.

वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी विश्वनाथ उगले यांनी लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेल्या २० क्विटल कांद्याला बुधवारी प्रतिक्विटल अवघा १०० रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले होते.

कांद्यापेक्षा साध्या पाण्याच्या बाटलीलाही दुप्पट भाव मिळतो, अशी तीव्र प्रतिक्रिया देत त्यांनी व्यापारी आणि शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

हमीभाव देण्याची मागणी

कांद्याला १०० रुपये क्विटल भाव मिळत असेल तर शेतकरी जगायचा कसा? व्यापारी मनमानी दर देत आहेत. शासनाने कांद्याला हमीभाव व अनुदान जाहीर कराव अशी मागणी विश्वनाथ उगले यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी यावेळी केली.

सचिवांची मध्यस्थी

दरम्यान, बाजार समितीचे सचिव संतोष पवार यांनी मध्यस्थी करत कांद्याच्या दरात ५० रुपये वाढ करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून दर्जेदार माल विक्रीसाठी आणावा. बाजार समिती शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे पवार यांनी सांगितले.

खिशातून पैसे भरण्याची वेळ

उगले यांनी सांगितले की, कांदा मार्केटपर्यंत आणण्यासाठी ट्रॅक्टर भाडे १७०० रुपये, मजुरी १००० रुपये आणि इतर खर्च २०० रुपये असा एकूण २९०० रुपयांचा खर्च झाला. मात्र कांद्याची पट्टी फक्त २ हजारांची झाल्याने खिशातून पैसे भरण्याची वेळ आली आहे.

एकूण खर्च अडीच लाख, मिळाले ३० हजार

उगले यांनी तीन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली असून सुमारे ३०० क्विटल उत्पादन झाले आहे. एकरी सुमारे ८० हजार रुपये खर्च झाल्याने एकूण खर्च २ लाख ४० हजार रुपयांवर पोहोचला. मात्र सध्याच्या बाजारभावानुसार संपूर्ण कांदा विकला तरी अवघे ३० हजार रुपये मिळण्याची शक्यता असून तब्बल २ लाख १० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT