निवडणुकीसाठी जिल्हाभरात ५ हजार पोलिसांचा फौजफाटा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : निवडणुकीसाठी जिल्हाभरात ५ हजार पोलिसांचा फौजफाटा

ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर : २७ गुन्हेगार तडीपार, ११८३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

A force of 5,000 police personnel has been deployed across the district for the elections

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. आचारसंहितेच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गुन् हेगारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून, १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान अवैध शस्त्रे, दारू आणि अंमली पदार्थांच्या अड्यांवर जोरदार कारवाई केली आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी जिल्ह्यात तब्बल ५ हजार २४८ पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सशस्त्र दलाच्या जवानांसह पोलिसांनी पथसंचलनही केले.

असा राहणार बंदोबस्त

पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या नेतृत्वात ८ उपअधीक्षक, १८ पोलिस निरीक्षक, १३७ सहायक निरीक्षक-उपनिरीक्षक, २ एसआरपीएफच्या तुकड्या, ४ दंगा काबू पथके, दामिनी, सायबरची राहणार नजर, ड्रोन पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.

तीन गावठी कट्टे, १३ तलवारी जप्त

पोलिसांनी या मोहिमेत एकूण १५ तलवारी जप्त केल्या असून, त्यांची किंमत सुमारे ३५, २०० रुपये आहे. तसेच चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ गावठी कट्टे आणि ५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

परवानाधारक ४८४ शस्त्र ठाण्यात जमा

जिल्ह्यात एकूण ५१२ परवानाधारक शस्त्रांपैकी ४८४ शस्त्रे सुरक्षितपणे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. बँक व अन्य अत्यावश्यक सेवेतील १६ परवानाधारकांना सूट देण्यात आली आहे. तर १२ जणांचे शस्त्र जमा करणे बाकी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी अत्यंत वेगाने काम करत १५२० समन्सपैकी १३०१ समन्स बजावले आहेत. तसेच ६१० अजामीनपात्र वॉरंटपैकी ४८९ वॉरंटची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

२७ तडीपार, ११८३ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता असल्यास गुन्ह्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा व्यक्तींवर पोलिस अधीक्षकांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील बीएनएसच्या १२६ अंतर्गत ९०६ जणांवर, १२७नुसार, १२८ नुसार, १४ आणि १२९ नुसार १०४ जणांवर ग्रामीण पोलिस दलाकडून कारवाई करण्यात आली. तर २७ जणांवर पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी तडीपारीची कारवाई केली आहे. दोन सराईत गुन्हेगारांच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्याचे सांगण्यात आले. यासोबतच १५८ व्यक्तींवर दारूबंदी कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दारू, गुटखा, गांजा विक्रेत्यांवर कारवाई

पोलिसांनी २० गुन्हे दाखल करून प्रतिबंधित ८ लाख ५० हजारांचा गुटखा जप्त केला. अंमली पदार्थांच्या विरोधात ५ मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, त्यात सुमारे १२ किलो अंमली पदार्थ गांजा व इतर असा ७.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अवैध दारू विक्रीविरुद्धही मोठी मोहीम उघडण्यात आली असून, जिल्ह्यात २४१ केसेस दाखल करून १८.१४ लाख रुपयांची ५७४९ लिटर दारू जप्त केली.

निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राध्यान्य असणार आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कोणीही अफवा पसरू नयेत. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा.
डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT