गव्हाली तांडा येथे नापिकी, दुष्काळाच्या विवंचनेत शेतकऱ्याने जीवन संपवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : गव्हाली तांडा येथे नापिकी, दुष्काळाच्या विवंचनेत शेतकऱ्याने जीवन संपवले

विहिरीचे दोन लाखांचे अनुदान तीन वर्षांपासून रखडले

पुढारी वृत्तसेवा

A farmer ended his life at Ghavali Tanda, driven to despair by crop failure and drought

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शासकीय योजनांचे रखडलेले अनुदान यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कन्नड तालुक्यातील गव्हाली तांडा येथील ६० वर्षीय शेतकरी विठ्ठल धुमा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.

विठ्ठल चव्हाण यांच्या कुटुंबात दोन मुले व तीन मुली आहेत. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. मागील तीन वर्षांपासून त्यांनी पंचायत समितीच्या योजनेतून विहीर खोदून तिचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र विहिरीच्या बांधकामाचे सुमारे दोन लाख रुपयांचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अनुदानासाठी त्यांनी तीन वर्षांपासून पंचायत समितीच्या कार्यालयाच्या चकरा मारल्या; मात्र अद्याप बिल निघाले नसल्याने त्यांची आर्थिक अडचण कायम राहिली.

यावर्षी त्यांनी दोन एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. मात्र पाण्याअभावी मका लवकर काढून त्या क्षेत्रात कांद्याची लागवड केली. विहिरीत उपलब्ध असलेले पाणी अवघ्या आठ दिवसांत संपल्याने कांदा पिकाला पाणी देता आले नाही. परिणामी संपूर्ण दोन एकर कांदा पीक करपून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

एकीकडे सोसायटीचे कर्ज,

दुसरीकडे नापिकी, विहिरीचे रखडलेले अनुदान आणि अपूर्ण घरकुल यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. या सर्व परिस्थितीमुळे विठ्ठल चव्हाण यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विठ्ठल धुमा चव्हाण यांच्या विहिरीचे बिल ऑनलाइन केलेले आहे. सद्यस्थितीत निधी अप्राप्त असून निधी प्राप्त होताच जमा होईल. अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी डॉ. रामावत यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT