Census Work : जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या तब्बल १० शिक्षकांवर गुन्हा दाखल होणार File photo
छत्रपती संभाजीनगर

Census Work : जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या तब्बल १० शिक्षकांवर गुन्हा दाखल होणार

मनपाची पोलिसांत तक्रार; ४० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

पुढारी वृत्तसेवा

A case will be registered against as many as 10 teachers who evaded the census work

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जनगणना २०२७ या राष्ट्रीय मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना वारंवार सूचना देऊनही कामावर हजर होण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या दहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी (दि. २४) सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.

झोन क्रमांक १ च्या सहाय्यक आयुक्त तथा जनगणना चार्ज अधिकारी लता पुजारी यांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, भारत सरकारच्या जन-गणना २०२७ उपक्रमांतर्गत घरगणना, घरयादी तयार करणे तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्यासाठी शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र संबंधित शिक्षकांनी वारंवार संपर्क करूनही कामावर रुजू होण्यास नकार दिल्याने जनगणनेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अंतर्गत संबंधित शिक्षकांविरोधात कारवाई करण्याची मागणी मनपाने पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीसोबतच संबंधित शिक्षकांची नावे व संपर्क क्रमांकांची यादीही पोलिस प्रशासनाला देण्यात आली आहे.

जनगणनेच्या कामासाठी नियुक्ती करूनही हजर न होता टाळाटाळ करणाऱ्या सर्व दहा झोनमधील सुमारे ४० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात सोमवार (दि. २५) पर्यंत कामावर हजर न झाल्यास त्यांच्याविरोधातही पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच मनपा आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये तातडीने पत्र देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT