A cable burned out at Jayakwadi, and a water pipeline burst at Dhorkin
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
शहर पाणीपुरवठ्याला लागलेले ग्रहण कायम आहे. बुधवारी मध्यरात्री १०० दललि क्षमतेच्या जलवाहिनीचा जायकवाडी पंपगृहातील वीज पुरवठा अचानक केबल जळाल्याने बंद झाला. या दुरुस्तीचे काम पहाटे पूर्ण होत नाही तोच ढोरकीनजवळ याच योजनेची जलवाहिनी फुटली असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहील, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शहरात पाणीबाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचे टप्पे देखील दोन दिवस पुढे गेले आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणारी ५६ आणि १०० दललिच्या दोन्हीही योजना जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे कधी पाइपलाइन फुटते तर कधी विद्युत पुरवठ्यात बिघाड होऊन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शंभर दलली क्षमतेच्या योजनेवरील नवीन जायकवाडी पंपगृह येथे ५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पंप एकच्या मोटार केबल कनेक्शनमधून धूर निघाल्याने ट्रीपींग झाल्याने पंपगृहातील संपूर्ण पंपिंग बंद झाली. त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी केली असता केबल जळाल्याचे निदर्शनास आले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत नव्याने बसविण्यात आलेल्या पंपाचे कॅपॅसिटर जळाले. तसेच १६०० केव्हीए ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल बाहेर फेकल्याने हे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले. विद्युत दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यावरच पहाटे ४.३० वाजता तीन पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर दुपारी १.४० वाजता पुन्हा तीन पंप बंद करून ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करून २.४० वाजता पंपिंग सुरू केली. परंतु त्याच वेळी ढोरकीन येथे शंभर दललि क्षमतेच्या योजनेची पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळताच पंपिंग बंद करण्यात आली. जायकवाडी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन वाईकर यांच्यासह कर्मचाऱ्यांची परिश्रम घेतले.
ढोरकीनजवळ जलवाहिनी फुटली
ढोरकीनजवळ दुपारी २.४० वाजता शंभर दलली क्षमतेच्या योजनेची १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. परंतु, १२०० च्या जलवाहिनीवर ९०० ची जलवाहिनी टाकून त्यावर सिमेंट कॉक्रीट करण्यात आल्याने ते फोडण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला. त्यानंतरही जलवाहिनी नेमकी कुठे फुटली, हे सायंकाळपर्यंत निदर्शनास आले नव्हते. त्यामुळे रात्रभर काम सुरू राहणार आहे. जलवाहिनीची दुरुस्ती झाल्यानंतरच पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.
सिडको-हडकोत ठणठणाट
१२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर शहराचा तब्बल ७० टक्के भाग अवलंबून आहे. त्यात सिडको हडकोचा देखील समावेश आहे. परंतु, सध्या ७०० सोबतच ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतूनही पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू असल्याने काही प्रमाणात शहरातील वसाहतींना दिलासा मिळाला. मात्र, सिडको-हडकोसह शहराचा काही भागात ठणठणाट कायम राहिला.