Mahavitaran Smart Meter : एका महिन्याचे ६७ हजार रुपये बिल file photo
छत्रपती संभाजीनगर

Mahavitaran Smart Meter : एका महिन्याचे ६७ हजार रुपये बिल

ग्राहकांच्या कार्यालयात खेट्या, अधिकारी म्हणतात आगोदर बिल भरा

पुढारी वृत्तसेवा

Light bill of ₹67,000 for one month

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गारखेडा परिसरातील न्यू गणेशनगरात राहणाऱ्या एका ग्राहकाला एका महिन्याचे लाईट बिल चक्क ६७६७० रुपये (युनिट ३१७८) आले आहे. हे बिल पाहून ग्राहकाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. या बिलाची दुरुस्ती करावी, अशी विनवणी करत तो कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे, परंतु अधिकारी म्हणतात आगोदर बिल भरा मीटरचे नंतर पाहू. स्मार्ट मीटरच्या या स्मार्ट धक्क्याने बेजार झालेल्या ग्राहकाने मुख्य कार्यालयात आपली कैफियत मांडली. त्याला अद्याप कोणाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाला आहे.

महावितरण स्मार्ट मीटर हे ग्राहकांसाठी सोयीचे असल्याचा वारंवार दावा करत आहे. नागरिक मात्र बिल जास्त येत असल्याची ओरड करत आहेत. या स्मार्ट मीटरचा गारखेडा परिसरातील न्यू गणेशनगरातील मुकेश पुरा जाधव यांना बसला आहे. जाधव यांनी महावितरणकडून फेब्रुवारी-२०२६ मध्ये नवीन घरगुती कनेक्शन (ग्राहक क्र.४९००१५५८०२४८) घेतले. पहिल्या महिन्याचे वीज बिल २०० रुपये आले.

ते भरल्यानंतर दुसऱ्या महिन्याचे बिल ६७६७० रुपये (युनिट ३१७८) एवढे आले. हे बिल पाहताच ग्राहकाने पन्नालालनगर येथील कार्यालयात जाऊन अर्जफाटे केले. दरम्यान, याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्यान पाहिले नाही. तोपर्यंत मे महिन्यात १९७युनिट तर जून महिन्यात २२६ युनिटचे बिल प्राप्त झाले. मार्च महिन्यातील बिलाचे पूर्ण डिटेल देण्यासही अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

वरिष्ठांकडूनही दखल नाही

मार्च महिन्यात मिळालेल्या चुकीचे बिल दुरुस्त करावे, असा अर्ज दिल्याने ग्राहकाने त्या पुढील महिन्याचे बिल भरले नाही. घरगुती वीज वापर नियमित २०० युनिटच्या आसपास असताना मार्च महिन्यात ३ हजारपेक्षा जास्त युनिट वापरल्याचे बिल आले कसे, याचे उत्तर अधिकारी द्यायला तयार नसल्याने जाधव यांनी मुख्य कार्यालयात बिल दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे. त्यावरही अद्याप काही रिप्लाय आला नसल्याची माहिती जाधव यांनी दिली.

मीटर जळाले असावे

आमच्याकडे दररोज १०० तक्रारी येतात. अशा तक्रारीचा कोणता ग्राहक आहे हे सांगता येत नाही, कदाचित त्याचे मीटर जळाले असावे. नेमके काय झाले ते पाहून घेऊ. संतोष अधिकार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, गारखेडा उपविभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT