सातशे वर्षांपूर्वीची बारव मोजतेय शेवटच्या घटका file photo
छत्रपती संभाजीनगर

सातशे वर्षांपूर्वीची बारव मोजतेय शेवटच्या घटका

एकलहेरा देवी मंदिर प्रशासनाचे दुर्लक्ष, भाविकांत संताप

पुढारी वृत्तसेवा

A 700-year-old well in a dilapidated condition.

करमाड, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या व रेणुकामातेचा अवतार मानला जाणाऱ्या श्रीक्षेत्र एकलहेरा येथील सुमारे सातशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन बारवाची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली असून, तो बारव सध्या शेवटची घटका मोजत आहे. विशेष म्हणजे, हा बारव एकलहेरा देवीच्या पुरातन मंदिराच्या आवारात असून, या देवीला रेणुकामातेचा अवतार मानले जाते. ऐतिहासिक नोंदीनुसार, या बारवाचा शेवटचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते.

एकलहेरा देवीचे मंदिर हे परिसरातील श्रद्धास्थान असून, जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या प्रमाणावर क्षेत्र पौर्णिमेच्या यात्रेला व नवरात्र उत्सवात दर्शनासाठी येतात. करमाडपासून पाच किलोमीटर अंतरावर तर पिंप्रिराजापासून चार किलोमीटर अंतरावर हे एकलहेरा देवीचे मंदिर आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. नवरात्रीत नऊ दिवस मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पडतात.

या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि मंदिरासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर देणग्या देतात. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर देणगी मिळूनही मंदिराच्या आवारातील ऐतिहासिक बारवाच्या जतन व संवर्धनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाविक व स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

सध्या बारवाच्या तटबंदीचे दगड ढासळत असून, पायऱ्यांवर व बारवाच्या वरच्या बाजूला झाडांची वाढ झाली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भाविक व इतिहासप्रेमींनी याबद्दल रोष व्यक्त केला असून, एकलहेरा देवीचे मंदिर हे आमचे श्रद्धास्थान आहे, पण त्याच आवारातील बारवाची अशी दुरवस्था पाहून मन विषण्ण होते, असे एका भाविकाने सांगितले.

अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या या बारवाकडे मंदिर प्रशासनाने दुर्लक्ष करणे अत्यंत खेदजनक आहे, असे इतिहास अभ्यासकांनी नमूद केले. दरम्यान, मंदिर समितीने तातडीने या बारवाचे जतन व संवर्धन करावे, अन्यथा हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा कायमचा नष्ट होण्याची भीती ग्रामस्थांनी आणि इतिहास प्रेमींनी व्यक्त केली. संबंधित एकलहेरा मंदिर प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

संभाजीनगर तालुक्यात ऐतिहासिक या * बारवाचा शेवटचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केल्याची नोंद आहे. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन केले, तर पुढील पिढीला हा ऐतिहासिक ठेवा प्रेरणा देईल.
- दिनेश शिंदे पाटील, इतिहास प्रेमी
एकलहेरा देवीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त या ठिकाणी येऊन हे पवित्र जल आपल्या डोक्यावर व पायावर घेऊनच पुढे देवीच्या दर्शनासाठी जातो. लवकरच या बारवाच्या जीर्णोध्द-ारासाठी प्रयत्न केला जाईल.
शैलेश चौधरी, पंचायत समिती सदस्य.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT