8 tolas of gold and silver looted by breaking into the house of a retired employee of PWD
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नातीचा साखरपुडा असल्याने कुटुंबीयांसह परगावी गेलेल्या एका सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) ६२ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातून तब्बल ८ तोळे सोने, चांदीचे दागिने आणि तीन पासपोर्ट असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना १७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान उल्कानगरी परिसरातील विश्वभारती कॉलनी येथे घडली.
फिर्यादी प्रकाश सखाराम मोरे (६२, रा. विश्वभारती कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, ते सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले असून, ते पत्नी व मुलीसह येथे राहतात. नातीच्या साखरपुड्याचा कौटुंबिक कार्यक्रम असल्याने ते शनिवारी (दि. १७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंबासह अंबेजोगाई येथे मुलीच्या सासरी गेले होते.
रविवारी (दि. १८) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे साफसफाईसाठी आलेल्या महिला कामगाराला घराचे मुख्य कुलूप तोडलेले दिसले. तिने तत्काळ फोन करून ही माहिती मोरे यांच्या पत्नीला दिली. त्यानंतर मोरे यांनी साडूचा मुलगा अतुल पवार यास फोन करून तत्कळ घराकडे जाण्यास सांगितले. त्याने घरी जाऊन खात्री केली असता घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
माहिती मिळताच मोरे कुटुंब रविवारी सायंकाळी तातडीने शहरात परतले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेतला जात आहे. बंद घराची रेकी करून पाळत ठेवून ही घरफोडी करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कपाटाचे लॉक तोडून ८ तोळे सोन्यावर डल्ला
चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून थेट बेडरूम गाठली होती. तेथील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सुमारे ८ तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. यामध्ये : सुमारे २७.५ ग्रॅमचे मिनी गंठण, २ तोळे आणि दीड तोळ्याच्या दोन चेन, ७ ग्रॅमचे कानातील टॉप्स, ५ ग्रॅमचे कानातील वेल, सुमारे ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि नाकातील तीन मोरणी, चांदीचे दागिने, घरातील तिघांचे मूळ पासपोर्ट आणि आधारकार्डही लंपास केले आहेत.