Ashadhi Ekadashi : विठुरायाच्या दर्शनासाठी मांदियाळी file photo
छत्रपती संभाजीनगर

Ashadhi Ekadashi : विठुरायाच्या दर्शनासाठी मांदियाळी

छोट्या पंढरपुरात ८ ते १० लाख भाविकांची उपस्थिती. आषाढी एकादशीचा उत्साह; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाअभिषेक

पुढारी वृत्तसेवा

8 to 10 lakh devotees attend small Pandharpur

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज महानगर परिसरातील छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (दि. २५) सुमारे ८ ते १० लाख भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेत चांगल्या पावसासाठी साकडे घातले. छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह पहायला मिळाला असून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.

शुक्रवारी रात्री उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. यात्रेत मुस्लिम बांधवांनी पाणीवाटप करत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. मात्र, प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तानंतरही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांचे दागिने लांबवल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. या यात्रेत जवळपास ८ ते १० लाख भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अहिल्यानगर महामार्गावर दुतर्फा दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मंदिर परिसरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

सामंत यांच्या हस्ते महाअभिषेक

आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाअभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. यावेळी खासदार संदीपान भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, पंचायत समिती सदस्य मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके, वडगावचे सरपंच सुनील काळे आदी उपस्थित होते. पूजेनंतर मंदिराचे द्वार भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. शनिवारी पहाटे ५ वाजता एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली.

सामाजिक सलोखा आणि फराळाचे वाटप

विठ्ठल भक्तीच्या ओढीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पंचक्रोशीतून आलेल्या दिड्यांमधून वारकरी छोट्या पंढरपुरात दाखल झाले. विविध सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी स्टॉल उभारून भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, केळी, मसाला दूध, चहा-पाण्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकोपा जोपासत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. यात्रेनिमित्त पालकमंत्री संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत और, आमदार अंबादास दानवे, नारायण कुचे, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिन्जू आदींनी पांडुरंगाचे दर्शन घेतले.

छोट्या पंढरपूरची सायकल वारी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी निमिताने येथील जिल्हा सायकल संघटनेतर्फे शानिवारी (दि. २५) सकाळी सेव्हन हिल येथून सायकलवरून छोट्या पंढरपूरची वारी करण्यात आली. वास्क-यांची वेशभूषा साकारून यंदा सायकलपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव कुंकुलोळ, अतुल जोशी, पोपट अळंजकर, अजय पांडे, सुधीर कुलकर्णी, संतोष हिरेमठ आदींसह सायकलपटूंनी वात सहभाग घेतला. संघटनेतर्फे दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉग्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटू आणि मोठ्या पंढरपूर येथील सायकल वारीत सहभागी झालेल्या सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला.

हायटेक बंदोबस्त, तरीही मंगळसूत्र चोरी

दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिस आणि मंदिर समितीने विविध उपाययोजना राबवल्या, यात चप्पल स्टैंड, एआय (Al) तंत्रप्रणाली, ६४ सीसीटीव्ही कॅमेरे, ५ ड्रोन कॅमेरे, पोलीस सर्व्हेलन्स व्हॅन, ४ वॉच टॉवर आणि पीए सिस्टीमचा वापर करण्यात आला. मात्र, चोरटडांनी गर्दीचा फायदा घेत काही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवले. पोलिसांनी यातील काही संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच, दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीत लहान मुले हरवल्याने अनेकांची ताटातूट झाली; परंतु पोलिस मदत केंद्रामुळे हरवलेल्या अनेक मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप परत करण्यात पोलिसांना यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT