78 easy deliveries in a single day at Ghati Maternity Ward
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागाच्या मातृत्व सेवेत गुरुवारी (दि. ३) एक उल्-लेखनीय आणि आनंददायी दिवस नोंदविला गेला. या एकाच दिवशी तब्बल ७८ प्रसूती सुरक्षितपणे पार पडल्या. यामध्ये ६१ सुलभ(नैसर्गिक) प्रसूती तर केवळ १७ सिजेरियन प्रसूती झाल्या. घाटीतील तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टर व परिचारिकांच्या तत्पर सेवेमुळे नवा आदर्श साध्य करण्यात यश आले.
सुलभ आणि कमी वेदनाच्या प्रसूतीसाठी घाटीच्या स्त्री रोग आणि प्रसूती विभागावर महिलांचा विश्वास आहे. यामुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्यातून अनेक गरोदर महिला प्रसूतीसाठी घाटीतील प्रसूती विभागात येतात. येथे दररोज शंभराहून अधिक गरोदर महिला दाखल होतात. तर दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. गुरुवारी पहिल्यांदा एकाच दिवसात तब्बल ७८ सुलभ प्रसूती झाल्या.
या दिवशी जन्मलेल्या बाळांमध्ये ३८ मुली व ४२ मुले अशी संतुलित संख्या आहे, जी सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे, २ जुळ्या मुलींचा जन्म झाला, तर केवळ ५ नवजात शिशूना तज्ज्ञांच्या काळजीसाठी एन.आय.सी.यू. (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. तसेच यादिवशी १५ अतिजोखमीच्या मातांची प्रसूती ही अगदी सुलभरीत्या पार पाडण्याची उल्लेखनीय कामगिरी घाटी रुग्णालयाने केली आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुके यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. दिती आनंद, डॉ. सीमा सोमवंशी यांची मोलाची कामगिरी आहे.
मातांसह बाळांचे घाटीच्या रुग्णसेवेवर विश्वास मोफत औषधोपचारामुळे घाटीवर भरोसा वाढला आहे. याचीच प्रचिती ३ सप्टेंबर रोजी दिसून आली. हा दिवस मातृत्व सेवेत आदर्श व यशस्वी ठरला आहे. सुरक्षित मातृत्व व आरोग्यदायी समाजाच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल आहे.-डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी.
एकाच दिवसात सर्व ७८ प्रसूती यशस्-वीरीत्या झाल्या. यात मातांचे व बाळांचे आरोग्य उत्तम आहे. हे यश प्रसूती विभागातील डॉक्टर, नर्सेस, निवासी डॉक्टर व इतर कर्मचारीवर्ग यांच्या अथक परिश्रम व समन्वयाचे प्रतीक आहे. -डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूती विभाग.