Marathwada Farmers : अतिवृष्टी काळात ७४ शेतकऱ्यांनी संपविले जीवन  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Farmers : अतिवृष्टी काळात ७४ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

मराठवाड्यात चालू वर्षात शेतकरी आत्महत्यांचा आकडा ७८१ वर

पुढारी वृत्तसेवा

74 farmers end their lives in heavy rain at Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात सर्वत्र अतिवृष्टी होऊन लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या कालावधीत विभागातील तब्बल ७४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात नांदेड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांत प्रत्येकी १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. नापिकी, दुष्काळ, अतिपावसामुळे होणारे नुकसान, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यातच यंदा पावसामुळे मराठवाड्यात धुमाकूळ घातला आहे.

विशेषतः सप्टेंबर महिन्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. हाताशी आलेली खरिपाची लाखो हेक्टरवरील पिके वाया गेली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे. जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात ७०७ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. त्यात अतिवृष्टीच्या कालावधीत म्हणजे सप्टेंबर महिन्यात यात आणखी ७४ आत्महत्यांची भर पडली आहे. सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात १७ आणि धाराशिव जिल्ह्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात १५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ आणि लातूर जिल्ह्यात ७शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही प्रत्येकी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

४४३ प्रकरणांत मदत मंजूर

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मराठवाड्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत ४४३ शेतकरी कुटुंबीयांना अशी मदत वाटप करण्यात आली आहे. एकूण ८७१ शेतकरी आत्महत्यांपैकी ९६ प्रकरणे विविध कारणांनी अपात्र ठरविण्यात आली आहेत. तर १८० प्रकरणे चौकशीवर आहेत.

वैयक्तिक स्वरूपाची मदत द्यावी शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे शेतकरीविषयक धोरणांमध्ये लपलेले आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने तीन नवीन कायदे आणून ही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कायदे लागू होऊ शकले नाहीत. सध्या अतिवृष्टीने नुकसान होऊन मराठवाड्यातील शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे. या परिस्थिती सरकारने शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपाची मदत करायला हवी. तिजोरीत पैसा नसेल तर कर्ज काढावे, नोकरदार, आमदार यांचे सहा महिन्यांचे वेतन थांबवावे.
कालीदास आपेट, शेतकरी नेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT