

नितीन थोरात
वैजापूर : राज्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदासाठीची सोडत जाहीर होताच शहरात राजकीय उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. या सोडतीनुसार वैजापूर नगराध्यक्षपद हे यंदा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, शहरातील सर्वच राजकीय गटांत आता उमेदवार निवडीची चुरस सुरू झाली आहे.
सोडतीचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक पक्षात हालचाल सुरू झाली असून, इच्छुक नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांत निवडणुकीचा धुरळा आता पासूनच उडू लागला आहे. सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले असून, राजकीय पट पुन्हा एकदा रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या दोन दशकांपासून वैजापूर नगरपरिषदेवर डॉ. दिनेश परदेशी यांची सत्ता राहिली आहे. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत असतानाच दशरथ बनकर व इतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नावं चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. ही नावे जोरात चर्चेत आहेत. तर शिंदे सेनेतून डॉ. डोंगरे यांचे नाव पुढे येत असून, त्यांच्या भोवतीही समर्थकांचा गट सक्रिय झाल्याचे चित्र आहे. सोडतीनंतर आता सर्वांचे लक्ष उमेदवार निवडीकडे लागले आहे. वैजापूरच्या राजकीय वर्तुळात आगामी काही दिवसांत नवे समीकरणे, नव्या युती आणि गाठीभेटींचा हंगाम रंगणार हे निश्चित.
निवडणुकीत चालणार जोरदार "लक्ष्मी"
वैजापूर नगराध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे केवळ राजकीय समीकरणच बदलणार नाही, तर शहरातील जुन्या राजकीय विरोध आणि पक्षीय मतसंपर्कांमध्येही नव्या संघर्षाची सुरुवात होणार आहे. तर निवडणूक ही पारंपरिक लढाईपेक्षा अधिक थरारक, रंगतदार आणि लक्ष्मी दर्शनाने होणार असल्याची चर्चा आहे.
तर नागरिकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, यंदा नगराध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याची नाही, तर शहराच्या राजकीय नकाशावर नवा इतिहास रचण्याची संधी ठरणार हे मात्र निश्चित.