पेडजाई देवीजवळ सापडले ७०० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अवशेष file photo
छत्रपती संभाजीनगर

पेडजाई देवीजवळ सापडले ७०० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अवशेष

गंगारखेड तालुक्यातील देवस्थान; वारसा समिती सदस्य, इतिहास अभ्यासकांची भेट

पुढारी वृत्तसेवा

700-Year-Old Historical Remains Discovered Near Pedjai Devi

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील टोकवाडी परिसरातील पेडजाई देवीच्या टेकडीवर तब्बल ७०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचे ऐतिहासिक भग्न अवशेष आढळून आल्याने इतिहास अभ्यासक आणि पुरातत्त्वप्रेमींत उत्सुकता निर्माण झाली आहे. परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा समितीचे सदस्य तथा शेषाबाई मुंढे महाविद्यालयातील इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. अविनाश खोकले यांनी नुकतीच या स्थळाची पाहणी करून अवशेषांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.

महाराष्ट्रात आदिशक्तीची उपासना प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात केली जाते. माहूरच्या रेणुका देवीचे उपपीठ म्हणून राणीसावरगावचे रेणुका देवी स्थान प्रसिध्द आहे. त्या कालखंडातील गंगाखेडच्या दक्षिणेस टोकवाडीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आणि मासोळी धरणाच्या उत्तरेस २ किमीवरील उंच टेकडीवर पेडजाई देवीचे प्राचीन ठाणे विराजमान आहे. मात्र हे ठिकाण आजपर्यंत दुर्लक्षित राहिले असून परिसरातील काही वाड्या आणि इसाद गावापुरतीच त्याची ओळख मर्यादित राहिली होती.

माजी नगरसेवक तुकाराम तांदळे यांच्या आग्रहास्तव डॉ. खोकले यांनी या ठिकाणाची बारकाईने पाहणी केली असता १३ व्या शतकातील मंदिराचे भग्र अवशेष आढळून आले. काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेले हे मंदिर वास्तुशा- स्त्रीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराची मूळ रचना गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशा स्वरूपाची असून मंदिर पूर्वाभिमुख होते.

आजही मंदिरातील मूळ आसनपीठ, चंद्रशिळा आणि स्तंभांचे काही अवशेष सुस्थितीत असल्याचे दिसले. मंदिराच्या पूर्वेस सुमारे ५०० मीटर अंतरावर काळ्या दगडात बांधलेले प्राचीन जलकुंडही आढळले. विशेष म्हणजे कोणतेही अतिरिक्त बांधकाम साहित्य न वापरता तयार करण्यात आलेल्या या कुंडामध्ये मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध आहे. सध्या गर्भगृहात देवीचे मोठे आणि छोटे असे दोन तांदळे असून त्यांची रचना महाराष्ट्रातील इतर देवीस्थळांपेक्षा वेगळी असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले. हे अवशेष कदाचित आपला वैभवशाली ऐतिहासिक वारसा जगाला सांगण्यासाठीच आजही जिवंत राहिले असावेत, असे मत व्यक्त केले.

टेकडी परिसरात सुरू असलेले खोदकाम तातडीने थांबवून नैसर्गिक सौंदर्य जपण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. पुरातत्त्व विभागाने या स्थळाकडे गांभीयनि लक्ष देऊन उत्खनन आणि संवर्धनाचे काम हाती घेतल्यास हे ठिकाण भविष्यात सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. पाहणीदरम्यान सरपंच प्रकाश नागरगोजे, देवीचे पुजारी गंगाधर सूर्यवंशी (गोंधळी) आणि चंदन लटपटे उपस्थित होते.

राणीसावरगावच्या रेणुका देवी मंदिराचा आणि पेडजाई देवीच्या मूळ मंदिराच्या बांधणीचा कालखंड एकच असावा. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी मूळ मंदिर पूर्णतः भन्न झाल्यानंतर त्याच जागेवर दगड, विटा आणि चुना-मातीच्या साहाय्याने नवीन गर्भगृह व लादणी प्रकारचा सभामंडप उभारण्यात आला. या नव्या बांधकामावर इंडो-इस्लामिक शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो, असे प्रा. डॉ. अविनाश खोकले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT