एकलहेरा-विटावा रस्त्यावर भरधाव हायवाने रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला चिरडल्याने घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

School Bus Accident : स्कूल बसमधून उतरताच चिमुकलीला हायवाने चिरडले

सात वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू : मोठी बहीण थोडक्यात बचावली

पुढारी वृत्तसेवा

वाळूज महानगर : स्कूल बसमधून उतरून घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या ७ वर्षीय चिमुकलीला वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका विना क्रमांकाच्या भरधाव हायवा ट्रकने चिरडल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. एकलहेरा-विटावा रस्त्यावरील विराज पार्कजवळ झालेल्या या भीषण अपघातात आरुषी कृष्णा तिवारी (७) या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिची मोठी बहीण किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने हायवावर दगडफेक करत चालकाला चोप दिला. मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले कृष्णा तिवारी हे गेल्या २० वर्षांपासून कुटुंबासह वाळूज महानगरात राहतात. एकलहेरा-विटावा रस्त्यावरील विराज पार्कजवळील एका गोदामावर ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांची लहान मुलगी आरुषी (७) ही विटावा येथील शाळेत इयत्ता २ री मध्ये शिकत होती.

मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर आरुषी आपल्या भावंडांसोबत स्कूल बसमधून विराज पार्कजवळ उतरली. तिला घेण्यासाठी तिची मोठी बहीण नंदिनी (१५) आली होती. आरुषी रस्ता ओलांडत असतानाच एकलहेराकडून वाळूज एमआयडीसीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या विना क्रमांकाच्या वाळूच्या हायवाने तिला जोराची धडक दिली. या अपघातात चाकाखाली सापडल्याने आरुषीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

अवैध वाळू वाहतुकीमुळे गेला निष्पाप जीव

वाळूज महानगर परिसरातील कासोडा, आंबेलोहळ, नांदेडा, आंबेगाव तसेच आसेगाव शिवारांतील नदी-ओढ्यांतून राजरोसपणे जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे. एकलहेरा, विटावा मार्गे रात्रंदिवस ही बेकायदेशीर वाहतूक चालते. महसूल व पोलिस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे वाळूमाफियांना मोकळे रान मिळाले असून, याच बेदरकार अवैध वाहतुकीने एका निष्पाप चिमुकलीचा बळी घेतल्याचा तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चालक पसार, संतप्त जमावाची दगडफेक

अपघातानंतर हायवा चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित लोकांनी त्याला पकडून चोप दिला. मात्र, तरीही संधी साधून त्याने लोकांच्या तावडीतून पळ काढला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने हायवावर दगडफेक करून समोरील काच फोडली. विना क्रमांकाच्या हायवा मालकाला घटनास्थळी बोलवा आणि इथेच पंचनामा करा, असा आक्रमक पवित्रा जमावाने घेतल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, वाहतूक शाखेचे पवन चौधरी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत जमावाला बाजूला केले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पिकअपच्या धडकेत महिला ठार

रस्ता ओलांडताना पडलेल्या महिला कामगाराच्या डोक्यावरून भरधाव पिकअपचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २५) रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास मेटलमेन कंपनीजवळ घडली. आरती बालाजी फुल्लारे (वय २९, रा. बजाजनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. आरती या वाळूज एमआयडीसी बी-१७ सेक्टरमधील मेटलमेन कंपनीत ठेकेदाराकडे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे काम संपवून त्या पायी घराकडे निघाल्या होत्या.

मेटलमेन कंपनीजवळ रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या मोपेडच्या हँडलला त्यांची पर्स अडकल्याने त्या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी एफडीसी चौकाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप जीपचे (एमएच २०-सिटी ३७६२) चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. कपिल राठोड व चालक राजू रोकडे यांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT