6591 Bhonges were removed from religious places
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
धार्मिक स्थळांवर लावलेल्या विनापरवानगी भोंगे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मुख्यमंत्र्यांची सभागृहात आणि पोलिस महासंचालकांनी परिपत्रक काढून निर्देश दिल्याने पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांत १९०६ धार्मिक स्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे धार्मिक पदाधिकारी, धर्मगुरू यांच्या बैठका घेऊन तसेच त्यांचे गैरसमज दूर करून काढल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शहरातील १०० टक्के भोंगे हटविले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी बुधवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव उपस्थित होते.
परवानगीधारक प्रार्थनास्थळांवर सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान केवळ ५५ डेसिबलच्या लाऊडस्पीकरला लावता येणार आहे. या मोहिमेला सर्वधर्मीय संघटना, संस्थांचे पदाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे भोंगे काढले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने बेकायदेशीर भोंग्यांसंदर्भात ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजा-वणीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या विषयाला कुठलाही राजकीय रंग न देता संवाद, समन्वय व सामोपचाराने विषय मार्गी लावण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती.
त्याला शहर पोलिसांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. शहरात जातीय संघर्ष, राजकीय संघर्ष चिंतेचा विषय आहे. नेहमी छोट्या छोट्या वादातून जातीय तणाव निर्माण होतो. त्यामुळे भोंग्याचा संवेदनशील विषयदेखील पोलिसांनी सामाजिक सलोखा ठेवून हाताळला. कुठेही आक्रमक भूमिका घेतली नाही. सर्वांशी संवाद साधून, बैठका घेऊन भोंगे काढून घेण्याचे आवाहन केले. १५ जुलै रोजी सुरू झालेली मोहीम ३० ऑगस्टपर्यंत ८० टक्के पूर्ण झाली होती असे डीसीपी नवले यांनी सांगितले.
पोलिसांनी घेतल्या ८३ बैठका
पोलिस पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी विविध धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चार बैठका घेऊन त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले. तत्पूर्वी पोलिस ठाणे निहाय ६१ बैठका पार पडल्या. त्यानंतर उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले, प्रशांत स्वामी यांनी देखील ७ बैठका घेतल्या. एसीपी स्तरावर देखील ११ बैठका घेण्यात आल्या. विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह सर्व १७ पोलिस ठाण्याचे प्रभारी, संबंधित शाखांचे अंमलदार यांनी अधिक परिश्रम घेतले.