छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे अंतिम अहवाल तयार झाले आहेत. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ६ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ५६१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
यंदा जून महिन्यापासून सातत्याने मराठवाडाभर अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. जवळपास सर्वच महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. हाताशी आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, आता अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात तब्बल ६ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तर जिल्ह्यात एकूण ६ लाख ७ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ५६१ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. यात कोरडवाडूसाठी हेक्टरी साडेआठ हजार, बागायतीसाठी हेक्टरी १७ हजार आणि फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार पाचशे रुपये इतकी मदत अपेक्षित आहे.