6 engineers rece for the post of Municipal City Engineer
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे शहर अभियंता फारुख खान हे येत्या २९ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या पदावर विराजमान होण्यासाठी ६ कार्यकारी अभियंत्यांमध्ये रस्-सीखेच सुरू असून, यात वसंत भोये, विजय गोरे, अनिल तनपुरे, संजय कोंबडे, बाळासाहेब शिरसाट आणि अमोल कुलकर्णी यांचा समावेश आहे.
यापदासाठी सर्व अभियंत्यांनी शहरातील मंत्री, खासदार आणि आमदारांची भेट घेत स्वतःची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु ही पदोन्नती देताना प्रशासन उपअभियंता-कार्यकारी अभियंता पदाच्या ज्येष्ठता यादीचा आधार घेणार की राजकीय पाठबळाचा विचार केला जाणार आहे, हे पदोन्नतीनंतरच स्पष्ट होणार आहे. महापालिकेत शहर अभियंता पदावरून नेहमीच अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते.
शहर अभियंत्यांकडे महापालिकेतील सर्वच तांत्रिक विभागांचे अधिकार असतात. त्यामुळे या पदोन्नतीसाठी कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या वरिष्ठ अधिकार्यातील वाद एकमेकांशी हमरीतुमरीपर्यंत पोहोचल्याचे किस्से महापालिकेत घडले आहेत. परंतु मागील १५ वर्षांपासून उपअभियंतांची पदोन्नती न केल्याने नुकतेच कार्यकारी अभियंता झालेल्या या सहा अभियंत्यांना शहर अभियंता पदाचा प्रभारी पदभारच मिळणार आहे. या पदासाठी सर्व तांत्रिक कामांचा अनुभव महत्त्वाचा आहे.
दरम्यान, प्रभारी शहर अभियंता खान हे आज २८ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे १ डिसेंबरपासून प्रशासनाला नवीन शहर अभियंता नियुक्त करावा लागेल. या पदासाठी सहा कार्यकारी अभियंते इच्छुक आहेत. यामध्ये कुलकर्णी हे बीई मेकॅनिकल, तर तनपूरे, शिरसाट दोघेही बीई सिव्हील आहेत. तसेच कार्यकारी अभियंता कोंबडे, गोरे आणि भोये हे डिप्लोमा इन सिव्हील आहेत. स्पर्धेत असलेले सहा कार्यकारी अभियंत्यांना अलीकडेच पदोन्नती देण्यात आलेली आहे.
राजकीय वरदहस्ताची गरज
शहर अभियंता पदावर बसणाऱ्या व्यक्तीमागे एखाद्या राजकीय नेत्याचे वरदहस्त आवश्यक असते. सध्या स्पर्धेतील सहा अभियंते आपापल्या पद्धतीने राजकीय मंडळींच्या भेटीगाठी घेत असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब शिरसाट यांचे भाऊ पालकमंत्री आहेत. परंतु दोघांमध्ये बेबनाव असल्याचीही चर्चा आहे. स्वतः पालकमंत्री शिरसाट यांनीच त्याची कबुली दिली होती. परंतु हे कितपत सत्य आहे, हे सांगणे अशक्यच आहे.