40 encroachments removed as soon as the video went viral
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
शहरात महिनाभराच्या विश्रांतीनंतर महापालिकेने पुन्हा सोमवारी (दि. २९) अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे. या रस्त्यावर तीन दिवसांपूर्वीच एक रुग्णवाहिका ३ तास वाहतूक कोंडीत अडकली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने रोशनगेट ते मदनी चौक या रस्त्यावरील ४० अतिक्रमणे काढली. यासोबतच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ७ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जुन्या शहरातील अनेक प्रमुख रस्ते अरुंद आहेत. असे असतानाही या रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळे निर्माण केले आहेत. यामुळे सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यातील रोशनगेट ते मदनी चौक या रस्त्यावर सोमवारी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. तीन दिवसांपूर्वीच या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती. या घटनेचा नागरिकांनीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हायरल व्हिडिओ एकाने महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनाही पाठविला होता.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओनंतर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी झोन ३ मधील अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सोमवारी सकाळीच अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी दाखल झाले. हे पाहून अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. या मार्गावरील अनेक मोठ्या तसेच कच्चे पक्के स्वरूपाचे लोखंडी टपऱ्या, ओटे, शेड आदींचे अतिक्रमण निष्काषित करण्यात आले. ही कारवाई नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ३ चे सहाय्यक आयुक्त नईम अन्सारी, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, संजय सुरडकर, मजहर खान, नागरी मित्र पथकप्रमुख प्रमोद जाधव यांचसह कर्मचाऱ्यांनी केली.
याच परिसरातील मदनी चौक ते मध्यवर्ती जकात नाका परिसरातील अतिक्रमणांवर आज मंगळवारी (दि. ३०) कारवाई केली जाणार आहे. त्यासोबतच चंपा चौक जिंजी ते दमडी महल या मार्गावरही होणार आहे. नागरिक, व्यापाऱ्यांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावी, नसता प्रशासनाच्या वतीने ते काढण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला.