250 families in distress due to Aushadhi Bhavan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरातील काही नाले खासगी संस्थांना इमारती उभारण्यासाठी भाडेपट्ट्यावर देत करारनामा केला आहे. त्यानुसार दरवर्षी मान्सूनपूर्व मोहिमेत या इमारतींखालून वाहणारे नाले बांधकामधारकांनी सफाई करणे बांधनकारक आहे. परंतु, औषधी भवनखालून वाहणारा नाला वर्षानुवर्षांपासून स्वच्छ झालाच नाही. त्यामुळे बुधवारी पहिल्याच पावसात दलालवाडी, चुनाभट्टी, गांधीनगरातील तब्बल अडीचशे घरे पाण्याखाली आले. या प्रकारानंतर गुरुवारी (दि. २५) परिसरातील संतप्त नागरिकांनी सभापती अनिल मकरिये यांना घेराव घालत नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्याची मागणी केली.
शहरात मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस वरुनराजांनी दमदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची दाणादाण उडाली. नेहमीप्रमाणे वर्षानुवर्षांपासून स्वच्छ न झालेल्या औषधीभवनचा नाला या पहिल्याच पावसात तुंबला. पाणी पुढे वाहून न गेल्याने नाल्यातील घाणपाणी औषधीभवन मागे असलेल्या दलालवाडी, गांधीनगर, चुनाभट्टी भागातील नागरिकांच्या घरात शिरले. या प्रकारामुळे बुधवारी रात्रभर या वसाहतींमधील सुमारे अडीचशेहून अधिक कुटुंब व त्यांच्या घरातील चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच रात्र जागून काढावी लागली. केवळ महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि औषधी भवनसारख्या संघटना असलेल्या राजकीय आशीर्वादामुळे येथील अडीचशे सामान्य कुटुंब संकटात आले आहेत.
या नाल्यातील पाणी दरवर्षी दलालवाडी शिरत असलेतरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास मनपाला यश आलेले नाही. प्रत्यक्षात औषधी भवन खालून वाहणाऱ्या नाल्यातून वर्षानुवर्षांपासून घाण काढण्यात आली नाही. त्यामुळे ही घाण अतिशय दगडाप्रमाणे घट्ट होऊन नाल्याच्या प्रवाहाला अडवित आहे. जेसीबी आणि विशिष्ट बनावटीच्या यंत्राद्वारे अथवा औषधी भवन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम आणि त्याचे स्लॅब पाडून त्याखालून नाल्याची स्वच्छता करणे हा एकमेव पर्याय प्रशासनापुढे शिल्लक राहिला आहे. हा नाला पुढे पिपल्स को आऑप. बँकच्या इमारतीखालून जातो. ही इमारत महापालिकेचीच आहे. नाल्याला वरच्या बाजूने उघडे करून स्वच्छ करणे हाच पर्याय आता महापालिकेकडे शिल्लक असल्याचेही बोलले जात आहे.
औषधी भवनच्या संचालक मंडळाने महापालिकेसोबत केलेला करारनामा केराच्या टोपलीत टाकला आहे. त्यामुळे औषधी भवनच्या इमारतीखालून वाहणारा नाला बंद पडला आहे. आता अडीचशे कुटुंबांसाठी करार मोडणाऱ्या औषधी भवनची इमारत महापालिका पाडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.