22 BJP rebels expelled
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी पक्षाचे अनेक इच्छुक होते. मात्र त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविर-ोधात बंडखोरी करीत इतर पक्षासह अपक्ष अर्ज दाखल केले. यासर्व बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहनही नेत्यांनी केले, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी शिस्त मोडणाऱ्या २२ बंखडोरांची रविवारी (दि.४) भाजपमधून हकालपट्टी केली.
महापालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून यंदा प्रत्येक वॉडाँसाठी इच्छुकांच्या रांगाच लागलेल्या होत्या. परंतु असे असले तरी सर्वच राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांची संख्या होती. त्यामुळे प्रत्येकाला उमेदवारी मिळेल, अशी आशा होती.
मात्र जागा ११५ आणि इच्छुक ९२२ असल्याने पक्षाकडून अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे नाराजांनी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळवत अर्ज दाखल केला, तर काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्या. यात तब्बल ९६ जणांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली.
भाजपचे ओबीसी कल्याणमंत्री, खासदार भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे अनेकांच्या घरी जाऊन उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी केली. यात नेत्यांना तब्बल ८० टक्के यश मिळाले. ७३ जणांनी उमेदवारी मागे घेत पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला, परंतु नेत्यांच्या आवाहनानंतरही २२ उमेदवारांनी माघार घेतली नाही. यासर्व उमेदवारांनी आता पक्षाविरोधात प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सर्व बंडखोरांना पक्षाच्या सर्व पदावरून निलंबित करून तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे आदेश रविवारी शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी नेत्यांच्या आदेशावरून जारी केले आहेत.
यांची केली हकालपट्टी
श्रीकांत घुले, कुणाल मराठे, तेजस व्यवहारे, गीता आचार्य, राजेंद्र वाहुळे, बळीराम कदम, प्रशांत भदाणे पाटील, मदन काका नवपुते, गणेश गरंडवाल, अरविंद डोणगावकर, राजू खरे, सुदाम साळुंके, प्रमोद नरवडे, संकेत प्रधान, श्रीभंडारी, देवयानी सिमंत, प्रमोद दिवेकर, राजश्री पगार, संतोष धुमाळ पाटील, आरती गुटलकर, रितू अग्रवाल, राहुल चाबुकस्वार यांचा समावेश आहे.