196 electricity consumers in Kannada taluka benefit from solar energy
कन्नड, पुढारी वृत्तसेवा दरमाह तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी तसेच अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ तालुक्यात १९६ वीज ग्राहक घेत आहेत.
जिल्ह्यातील २००४ वीज ग्राहक असून, यात सर्वात अधिक छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ९९५ तर सर्वात कमी ८ वीज ग्राहक सोयगाव तालुक्यात लाभ घेत आहेत. योजना सुरू होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील २००४ हजार ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीज निर्मितीचा लाभ घेतला आहे.
१ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत मोफत वीज या योजनेतून मिळते. शिवाय गरज भागवून शिल्लक राहिलेली वीज महावितरणला विकता येते व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीज बिलात समायोजित केली जाते.
सुमारे २५ वर्षे विना देखभाल या प्रकल्पांतून मोफत सौर बीज उपलब्ध होण्यासाठी जवळच्या महावितरण कार्यालय तसेच पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती उपलब्ध असून, नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो.
वीज ग्राहकांना प्रोत्साहन निधी व अनुदान विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्ज मिळते. ग्रामीण भागातील ग्राहकांना प्रोत्साहन देण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर प्रोत्साहन निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
▶ १ किलो वॅट साठी ३० हजार रु.
▶ २ किलो वॅट साठी ६० हजार रु. तर
▶ ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते,
घरगुती वीज ग्राहकांबरोबरच गृहनिर्माण संस्था, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.