18 tolas of gold looted after breaking into the house of a government employee who had gone out of town
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुटुंबासह मूळगावी बुलढाणा येथे गेलेल्या आरोग्य विभागातील शासकीय कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल १८ तोळे सोने, चांदी आणि रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान इटखेडा परिसरात घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विजय मधुकर जवरे (५३, रा. गट नं. २४, वास्तू प्रतिभा अपार्टमेंटसमोर, इटखेडा) यांच्या तक्रारीनुसार, ते आरोग्य विभागात शासकीय नोकरी करतात. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ते घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून कुटुंबासह आपल्या मूळगावी बुलढाणा येथे गेले होते. सलग पाच दिवस घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला.
१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जवरे कुटुंब बुलढाणा येथून घरी परतले असता, त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता बेडरूममधील कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त विखुरलेले होते आणि कपाटातील लॉकरमधून दागिने व रोकड गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक निर्मला राख या करत आहेत.
लंपास केलेला मुद्देमाल
सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे लाँग गंठण, सव्वा दोन तोळ्याचे मिनी गंठण, तीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या, तीन तोळ्याचे सोन्याचे वेडे, दोन तोळ्याचे लहान मुलांचे दागिने (जिवते, ओम, दोन छोट्या अंगठ्या व कानातल्या बाळ्या), दीड तोळ्याची सोन्याचा गोफ, दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या, सव्वा तोळ्याचा नेकलेस, चांदीची वीस तोळे (पायातील चेन व इतर छोट्या वस्तू) आणि २० हजाराची रोकड असा ऐवज चोरीला गेला.