अकोलीच्या वारकरी शिक्षण संस्थेतील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा file photo
छत्रपती संभाजीनगर

Gangakhed : अकोलीच्या वारकरी शिक्षण संस्थेतील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा

कढी-भात खाल्ल्यानंतर मळमळ, डोकेदुखीचा त्रास; चौघांना पुढील उपचारासाठी परभणीला हलविले

पुढारी वृत्तसेवा

18 students of Akoli's Warkari Educational Institute poisoned

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अकोली येथील वारकरी शिक्षण संस्थेतील १८ विद्यार्थ्यांना कढी-भात खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने विद्यार्थ्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चौघांचा रक्तदाब कमी-अधिक होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अकोली येथील वारकरी शिक्षण संस्थेत सुमारे ६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संबंधित दिवशी रात्रीच्या जेवणात कढी-भात खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला संस्थेचे संचालक आकाश महाराज शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या गोळ्या दिल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थ्यांचा त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरुवातीला चार विद्यार्थ्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य विद्यार्थ्यांनाही उपचारासाठी आणण्यात आले. अशा एकूण १८ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

यातील चौघांच्या रक्तदाबात चढ-उतार होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले. गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. परभणी येथे हलविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचाही रक्तदाब आता सुरळीत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेमुळे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विद्यार्थ्यांना झाली विषबाधा

विषबाधेचा संशय असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतीक कैलास यादव, रामेश्वर श्रीधर माने, सोहम वसंत सानप, विनायक भागवत लोंढे, शुभम यमगर, गणेश बापूराव मदने, मंथन मोतीराम काटे, समर्थ रुस्तुम देवकते, यश किसन माने, ऋषिकेश अशोक माने, अभिषेक विक्रम मुंडे, रमेश केशव ढाकणे, योगीराज मारुती सुरनर, ईश्वर गोविंद डिगोळे, जनार्दन दिगंबर पांढरे, कृष्णा रंगनाथ सावळे आणि कृष्णा बालासाहेब यमगर आर्दीचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT