छत्रपती संभाजीनगर (वाळूज): केवळ एक मोबाईल फोन घेऊन दिला नाही, या क्षुल्लक कारणावरून एका 16 वर्षीय मुलाने थेट डोंगरावरून उडी मारून आपले जीवन संपवल्याची अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अथर्व गोपाल तायडे असे या मृत मुलाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व तायडे हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी होता. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत वाळूजजवळील साजापूर शिवारातील स्वास्तिक सिटी येथे राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याने आपल्या आईकडे नवीन मोबाईल फोनसाठी हट्ट धरला होता. मात्र, आईने त्याला नकार दिला.
आईच्या नकाराने अथर्व प्रचंड संतापला. याच रागाच्या भरात त्याने घर सोडले आणि थेट तिसगाव येथील प्रसिद्ध खावडा डोंगर गाठले. तेथे त्याने डोंगराच्या कड्यावरून खाली उडी मारली.
डोंगरावरून उडी मारल्याने अथर्व गंभीर जखमी अवस्थेत पडलेला पाहून परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या घटनेचे साक्षीदार असलेले अतुल आडे आणि स्वप्नील पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आईने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. एका मोबाईलसाठी मुलाने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एका मोबाईल फोनसाठी अल्पवयीन मुलाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे पालक वर्गात आणि समाजात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.