Sillod News : ट्रेलरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; आई-वडील जखमी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : ट्रेलरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; आई-वडील जखमी

पालोद फाट्यावर कारसह दोन दुचाकींना धडक; ट्रेलरचालक वाहन सोडून पसार

पुढारी वृत्तसेवा

14-year-old boy dies on the spot after being hit by a trailer; parents injured

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा पेट्रोल भरून पुढील प्रवासाला निघण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. पालोद फाट्यावर हॉटेलसमोर उभ्या असलेल्या व्हॅगनार कारसह दोन दुचार्कीना सिमेंट ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील १४ वर्षीय दत्ता शांताराम उघडे (रा. पालोद) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील शांताराम महादू उघडे (वय ४२) व आई अनिता शांताराम उघडे (वय ४०) जखमी झाले हा अपघात रविवारी (दि. ४) सकाळी साडेआठच्या सुमारास पालोद फाट्यावर सोमीनाथ काटकर यांच्या हॉटेलसमोर घडला.

दत्ता उघडे हा आई-वडिलांसोबत कारने प्रवास करीत होता. हॉटेललगतच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर ते हॉटेलसमोर कारमध्ये बसले होते. काही क्षणांतच पुढे सिल्लोडकडे जाण्याच्या तयारीत असताना अजिंठ्याकडून सिल्लोडकडे जाणाऱ्या सिमेंट ट्रेलरने (एनएल ०१, एबी ४०६२) कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत कार (एमएच ०४-डीवाय ३२३८) पुढे ढकलली गेली आणि हॉटेलसमोर उभ्या असलेल्या एमएच २०-एफएच ८६५८ व एमएच २०-जीएस ९५८४ क्रमांकाच्या दोन दुचाकींनाही धडक बसली. कारमधील दत्ता उघडे याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे आई-वडील जखमी झाले असून, त्यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, दोन्ही दुचाकीस्वार आपापल्या दुचाकी हॉटेलसमोर उभ्या करून नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यामुळे सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली आ नाही. मात्र, दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रेलरचालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला.

ग्रामीण पोलिसांनी ट्रेलर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात लावला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. दत्ता उघडे याच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी पालोद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संजय आगे व रवींद्र आंबेकर पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT