1.35 lakh voters turn out in the graduate election
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विभागातील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु, यंदा ३ लाख २६ हजार ७०० मतदारांपैकी केवळ १ लाख ९१ हजार ६७९ मतदारांनी हक्क बजावला. तर तब्बल १ लाख ३५ हजार ११ जणांनी मतदानाकडे पाठ फिरवली.
विशेष म्हणजे मतदान करण्यासाठी शहरातील अनेक केंद्रांवर तरुण-तरुणींचीच सर्वाधिक गर्दी दिसून आली. तर ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासह विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनीदेखील आपला हक्क बजावला.
मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात २१७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात ९३ हजार ३१८ मतदार आहेत. यामध्ये ६६ हजार ३८५ पुरुष, २६ हजार ९२८ महिला आणि ५ इतर मतदारांचा समावेश आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३९ हजार २७० पुरुष आणि १२ हजार ७३७ महिला मतदार असे ५२ हजार ७ मतदारांनी हक्क बजावला. यात ५९.१५ टक्के पुरुष मतदारांनी तर ४७.३० टक्के महिला मतदारांची असे एकूण ५५.७३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
छत्रपती संभाजीनगरसह विभागातील इतर सातही जिल्ह्यांतील मतदान प्रक्रियेवर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे प्रत्येक बाबींवर ऑनलाईन लक्ष होते. जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक व्यवस्थेवर देखरेख ठेवली. संभाजीनगर शहरातील मतदान केंद्रावर तरुणांसह तरुणांची मतदानासाठी गर्दी दिसून आली. यात मुस्लिमबाहुल भागातही अनेक पदवीधर मतदारांनी मतदानचा हक्क बजावली.
महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना जास्त मते मिळावित, यासाठी भाजपने शहरातील प्रत्येक मतदान केंद्रासोबत वसाहतींमध्ये कार्यकर्ते सज्ज केले होते. ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी ९४ मतदान केंद्रांवर सुक्ष्म नियोजन केले.