छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: घरोघरी ज्येष्ठा गौरींचे गुरुवारी उत्साहात आगमन झाले. शुक्रवारी (दि.१८) उत्साहात आणि भक्तिभावाने 'गौरीपूजन' करण्यात आले. लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर, माहेरवाशिणीच्या रूपाने आलेल्या गौराईच्या स्वागतासाठी घराघरांमध्ये आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
गौरीपूजनाच्या मुख्य दिवशी घराघरांमध्ये सुवासिनींनी आकर्षक मखर, फुलांची आरास आणि रोषणाईने पूजेची जागा सजवली. गौराईला १६ प्रकारच्या भाज्या, कोशिंबिरी, चटण्या, पुरणपोळी, मोदक आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आले. महिलांनी पारंपरिक वस्त्र आणि दागिने परिधान करून गौराईची महाआरती केली.
सुवासिनींसाठी हळदी-कुंकू, ओटी भरणे आणि रात्रीच्या वेळी पारंपरिक 'झिम्मा फुगडी' खेळण्याचे आयोजनही काही ठिकाणी करण्यात आले होते. शनिवारी (दि.१९) सकाळी दही-भाताचा शिदोरीचा नैवेद्य दाखवून आणि आरती करून या लाडक्या माहेरवाशिणीला भावपूर्ण निरोप दिला जाईल.