शटडाऊनपूर्वीच १२०० ची जलवाहिनी फुटली file photo
छत्रपती संभाजीनगर

शटडाऊनपूर्वीच १२०० ची जलवाहिनी फुटली

शहरात ऐन उन्हाळ्यात निर्जळी, पाण्याचे टप्पे दोन दिवस पुढे

पुढारी वृत्तसेवा

1,200 mm Water Pipeline Bursts Just Before Shutdown

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर काही ठिकाणी मोठी गळती सुरू आहे. या दुरुस्तीसाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून १० तासांच्या शट डाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्यापूर्वीच गुरुवारी (दि. ७) दुपारी जायकवाडीत व सायंकाळी फारोळा जलशुद्धीकरण केंद्राजवळ याच जलवाहिनीला भगदाड पडले. यानंतर तातडीने पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीसाठी शटडाऊन सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. त्यामुळे आता पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे गेल्याने शहरात पाणीबाणीचे संकट निर्माण होणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्या १२०० मि.मी. आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्यातून पाण्याचा दाब थोडाही वाढला की, त्यांना भगदाड पडत आहे. त्यामुळे शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. हे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला या जुन्या जलवाहिन्यांचाच आधार घ्यावा लागत आहे.

या दोन्ही जुन्या जलवाहिन्यांपैकी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर जायकवाडी ते नक्षत्रवाडी यादरम्यान काही ठिकाणी मोठी गळती सुरू आहे. त्यामुळे या दुरुस्तीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून दहा तासांचा शटडाऊन घेण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले होते. परंतु, त्यापूर्वीच जायकवाडी धरणापासून काही अंतरावर असलेल्या जायकवाडी कॉलनीतून जाणारी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला भगदाड पडल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाला मिळाली. त्यामुळे तातडीने जायकवाडीतून पंप बंद करून पाणीपुरवठा थांबविण्यात आला.

दरम्यान, तातडीने या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी रिकामी करण्यास सुरुवात केली. त्यातील पाणी फारोळ्यापर्यंत नेण्यात आले. मात्र, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात जेवढे पाणी शिल्लक होते. ते प्रक्रिया करून १२०० मि.मी.च्या जलवाहिनीतून शहराकडे पाठविणे सुरू असताना अचानक सायंकाळी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापासून काही अंतरावर पुन्हा एक मोठी गळती सुरू झाली.

याबाबत माहिती मिळताच हा पाणीपुरवठा देखील बंद करण्यात आला. दोन्ही ठिकाणच्या गळत्यांच्या दुरुस्तीसोबतच शटडाऊनमध्ये करण्यात येणाऱ्या दुरुस्तीचे कामही महापालिका पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी सायंकाळपासूनच हाती घेतले. त्यामुळे शुक्रवारचा शटडाऊन गुरुवार सायंकाळपासूनच सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे यांनी सांगितले. आता हे संपूर्ण दुरुस्तीचे काम शुक्रवारी दुपारपर्यंत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असेही सांगण्यात आले.

पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे

शहराच्या ६० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील गळत्यांच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी सायंकाळी महापालिकेने सुरू केले आहे. यामुळे गुरुवारी सायंकाळचे पाण्याचे टप्पे आणि शुक्रवारी दिवसभर होणारे पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहेत. नागरिकांच्या या गैरसोयीबद्दल महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT