12 AVGC parks in the state; Sambhajinagar also included
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्यातील सर्जनशील आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी १२ अत्याधुनिक एव्हीजीसी (अनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अॅण्ड कॉमिक्स) आणि एक्सआर (एक्सटेंडेड रिअॅलिटी) पार्क उभारण्यात येणार आहेत. यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसोबतच छत्रपती संभाजीनगर शहराचाही समावेश करण्यात आल्याने येथील उद्योगांना नवीन चालना मिळणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. त्यानूसार या पार्कमध्ये जागतिक दर्जाची डिजिटल कंटेंट निर्मितीची पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हर्चुअल प्रॉडक्शन स्टुडिओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित रेंडरिंग सुविधा असणार आहे. यामुळे ऍनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, चित्रपट निर्मिती आणि डिजिटल मीडिया क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, हजारो कुशल रोजगार आणि नव्या उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमात संभाजीनगराचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे शहरात डिजिटल मीडिया, ऍनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या विकासाला चालना मिळून स्टार्टअप्स आणि सर्जनशील क्षेत्रातील उद्योजकांना विस्ताराची संधी उपलब्ध होईल.