Film Festival | ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान! 
छत्रपती संभाजीनगर

Film Festival | ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान!

आयोजकांच्यावतीने महोत्सवांच्या तारखांची अधिकृत घोषणा !

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखांची आयोजकांच्यावतीने घोषणा करण्यात आली. बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हा महोत्सव रुक्मिणी सभागृह, एम जी एम परिसर व आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे.

आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट छत्रपती संभाजीनगरच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपटजाणीव अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.

पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार, सुवर्ण कैलास सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, भारतीय सिनेमा स्पर्धा, जागतिक सिनेमा विभाग, रेट्रोस्पेक्टीव्ह, ट्रिब्युट, मास्टर क्लास, विशेष व्याख्यान, स्पेशल स्क्रिनिंग, परिसंवाद, पोस्टर प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल यावर्षीच्या महोत्सवात असणार आहे. त्यासंदर्भातील अधिक तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल असे आयोजकांनी कळविले आहे.

या महोत्सवात महाराष्ट्रातील सिनेरसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सवाच्या आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, फेस्टिवल डायरेक्टर सुनील सुकथनकर, चंद्रकांत कुलकर्णी, निमंत्रक नीलेश राऊत आदींनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT