Ilaiyaraaja honoured the Padmapani Award pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

11th Ajanta Ellora International Film Festival | भावनांसह निर्माण होणारे संगीत हृदयापर्यंत पोहचते : पद्मविभूषण इलायाराजा

११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

11व्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (AEIFF) संगीत सम्राट पद्मविभूषण इलायाराजा यांनी संगीत आणि भावनांचा अतूट संबंध स्पष्ट केला.

11th Ajanta Ellora International Film Festival

छत्रपती संभाजीनगर : संगीतामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. वाद्यासह तयार होणारे संगीत हे आपल्या कानापर्यंत पोहोचते. मात्र, भावनांसह निर्माण होणारे संगीत हे हृदयापर्यंत पोहोचते, असे प्रतिपादन पद्मविभूषण इलायाराजा यांनी यावेळी केले.

अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज एमजीएम विद्यापीठात पार पडले. ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण इलायाराजा यांना त्यांच्या भारतीय सिनेमा संगीतातील अतुल्य योगदानाबद्दल पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लक्ष रुपये असा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, ऑस्कर विजेते ध्वनी संयोजन रसूल पुक्कूट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन सी.एस.व्यंकटेश्वरन, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, सचिन मुळे, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत उपस्थित होते.

इलायाराजा म्हणाले, 'मी कोणताही विचार न करता थेट संगीत लिहितो. आतापर्यंत १५४५ चित्रपटांसाठी काम केले. १५४५ दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत कार्य करण्याची संधी मला मिळाली आहे. काहीही नवीन तांत्रिक गोष्टी वापरत नाही. आजही cr संगीत शिकत आहे. आज सकाळीच माझ्या १५४५ व्या चित्रपटासाठी संगीत तयार करून मी या कार्यक्रमासाठी हजर राहिलो आहे.

पियानोवर बोट ठेवलं की, संगीत तयार होत आहे. सराव, भावना आणि वाद्यापासून तयार होणारे संगीत सध्याच्या यांत्रिकतेच्या काळात मनाला भावणारे आहे. मला आज या ठिकाणी येऊन पद्मपाणि पुरस्कार स्वीकारत असताना आनंद झाला आहे.

कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने ‘हे विश्वची माझे घर’ या ब्रीदवाक्याला अनुसरून गेल्या १० वर्षांत छत्रपती संभाजीनगर शहराला जागतिक सांस्कृतिक चळवळींशी सातत्याने जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदीसह मराठी भाषेतही इलायाराजा यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत ७००० हून अधिक गाणी आणि १५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीतनिर्मिती करणाऱ्या, भारतीय संगीताचा आत्मा असणाऱ्या पद्मविभूषण इलायाराजा यांनी पद्मपाणि पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल म्हणाले, पद्मविभूषण इलायाराजा यांनी नऊ भाषांमध्ये सुमारे ७ हजारहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. या महोत्सवाचे इतिहाशी एक वेगळे नाते असून महोत्सवात पद्मपाणि, सुवर्ण कैलास असे विविध इतिहासाशी जोडणारे पुरस्कार दिले जातात. पुढच्या वर्षापासून सुवर्ण शालीवाहन पुरस्कार मराठी चित्रपट स्पर्धेसाठी दिला जाणार आहे.

ऑस्कर विजेते ध्वनी संयोजनकार रसूल पुक्कुट्टी यावेळी बोलताना म्हणाले, पद्मविभूषण इलायाराजा हे अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ, अतिशय दयाळू आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत. आम्हांला त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.

या महोत्सवात एकूण ७० चित्रपट दाखविण्यात येणार असून हे माझे महोत्सवात कार्य करण्याचे दुसरे वर्ष आहे. विविध प्रकारच्या चित्रपट स्पर्धा या महोत्सवात आयोजित करण्यात आल्या असल्याचे दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांनी यावेळी सांगितले.

तमिळ लोकांच्या आग्रहाखातर पद्मविभूषण इलायाराजा यांनी ‘जननी जननी...’ हे गाणे गायले. दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील कार्याबद्दल छत्रपती संभाजीनगरची अभिनेत्री भाग्यश्री बोरसे हिचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.शिव कदम यांनी केले.

अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दु:खद निधानबद्दल शोक संदेश व्यक्त केला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करीत श्रद्धांजली अर्पण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT