102 property registrations in Chikalthana in two days
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा नोंदणी व मुद्रांक विभागाने बीड बायपासनंतर पुन्हा मुख्य कार्यालयातील इतर दोन सह दुय्यम निबंधक कार्यालयांचे स्थलांतर केले आहे. त्यातील एक कार्यालय गारखेड्यात तर दुसरे नुकतेच चिकलठाण्यात स्थलांतरित झाले असून या नव्या दस्त नोंदणी कार्यालयात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांतच १०२ दस्त नोंदणी झाली आहे. त्यातून सुमारे ५ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. या कार्यालयामुळे शेंद्रा डीएमआयसीलगतच्या ग्रामस्थांचा २० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या जिल्हा नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्त नोंदणी कार्यालये मुख्य इमारतीतून इतरत्र स्थलांतर करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये सह दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाच सह दुय्यम निबंधक कार्यालये होती. मात्र, या परिसरात मोठ्याप्रमाणात एजंटचा त्रास अधिकाऱ्यांना होत आहे. त्यामुळे प्रशासनाने काही वर्षांपूर्वीच येथील २ कार्यालये बीड बायपास परिसरात स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर नुकतेच एक कार्यालय गारखेड्यात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, १८ ऑगस्ट २०२६ पासून आणखी एक कार्यालय चिकलठाणा परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे. विमानतळ परिसरातीहल भारतीय स्टेट बँकेच्या मागे हे कार्यालय असून या नव्या कार्यालयात शासकीय कामकाज पूर्ण क्षमतेने आणि सुरळीत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी या सुविधेला मोठा प्रतिसाद दिला.
प्रभारी सह दुय्यम निबंधक निर्मला बहुरे यांनी या संदर्भातील अधिकृत अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. पहिल्या दिवशी ५२ दस्तांची तर दुसऱ्या दिवशी ५० अशा १०२ दस्तांची नोंदणी यशस्वीरीत्या पार पडली. यातून शासनाच्या तिजोरीत मुद्रांक शुल्क आणि दस्त नोंदणी शुल्कातून सुमारे ५ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
जुनी इमारत जीर्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नोंदणी व मुद्रांक कार्यालयाची जुनी शासकीय इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात छतातून पाणी टपकते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यायलाचे स्थलांतर केले. नव्या कार्यालयात येणाऱ्या वृद्ध, महिला व नागरिकांना बसण्याची व्यवस्था आहे. तसेच लगतच बँक असल्याने मुद्रांक शुल्क व नोंदणी फीचे आर्थिक व्यवहार अत्यंत सुरक्षित होत आहे.