मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर: मोबाईल, दुचाकी चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर

अविनाश सुतार

पैठण : मोबाईल व मोटरसायकल चोरी करण्यासाठी राजरोसपणे अल्पवयीन मुलाचा सराईत गुन्हेगारांकडून वापर होत आहे, असे प्रकार पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर येऊ लागले आहेत. मागील आठवड्यात कुतबखेडा (ता. पैठण) येथील तीन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोटर सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, या टोळीकडून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरल्या आहेत. आठ दुचाकींची अहमदनगर जिल्ह्यासह इतर गावांमध्ये विक्री केली होती. या दुचाकी पैठण पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्यांना मात्र कारवाईतून विशेष सूट दिल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे. अधिकचा महिना असल्यामुळे पैठण येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त गोदावरीचे स्नान करण्यासाठी येत असतात. या संधीचा फायदा घेऊन शुक्रवारी (दि. ४) दुपारी तीन तरुण भाड्याच्या रिक्षाने पैठण येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते.

बस स्थानकाच्या परिसरात यातील एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने एका प्रवाशाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार हमालाच्या निदर्शनास आला. हमालाने इतर प्रवाशांच्या मदतीने त्या मुलाला ताब्यात घेतले. तर त्या मुलाचे दोन साथीदार रिक्षासह तेथून पळून गेले. पकडून ठेवलेल्या अल्पवयीन मुलाला पैठण पोलीस ठाण्याचे जमादार सुधीर ओहोळ यांच्या ताब्यात दिले. सदरील अल्पवयीन मुलाला विश्वासात घेऊन पळून गेलेल्या मुलांबाबत माहिती घेतली. दरम्यान, बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी न करता त्या मुलाला पोलिसांनी सोडून दिले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT