मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी पोलिस उपायुक्तांची वाढीव दोन पदे मंजूर

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस उपायुक्तांची दोन वाढीव पदे मंजूर झाली आहेत. त्यामुळे आता उपायुक्तांची संख्या पाच होईल. ४ ऑगस्ट रोजी शासनाने याबाबत आदेश काढले. यातून वाहतूक आणि गुन्हे शाखेला वेगळे उपायुक्त मिळू शकतात. पोलिस अधीक्षक (प्रशासन) विशेष सुरक्षा, राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई आणि पोलिस अधीक्षक मोटार परिवहन विभाग, पुणे ही दोन्ही पदे छत्रपती संभाजीनगर पोलिस आयु्तालयात वर्ग करण्यास शासनाने मंजुरी दिली. पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील या पदांचे नाव पोलीस उपायुक्त करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश सह सचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीचा प्रश्न शासन दरबारी रेंगाळत पडून होता. त्यातील पहिला आणि मुख्य मुद्दा आता निकाली निघाला आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्यानंतर तीन उपायुक्त असून मुख्यालय, परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२, अशी रचना आहे. त्या खालोखाल आठ सहायक पोलिस आयुक्त असून १७ पोलिस ठाणे आहेत.

छत्रपती संभाजीनगर हे अतिसंवेदनशील शहर आहे. २०१८ पासून येथे सातत्याने सामाजिक तेढ निर्माण होऊन दंगल उसळते. रामनवमीच्या पूर्वसंध्येला नुकतीच किराडपुरा येथे दंगली उसळली होती. शहर पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडल्याचे तेव्हा प्रकर्षाने समोर आले होते. त्यामुळे निर्णयक्षम अधिकाऱ्यांची संख्या शहरात अधिक असणे गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर दोन पोलिस उपायुक्त पदे मंजूर झाल्याने वाहतूक आणि गुन्हे शाखेला वेगळे उपायुक्त दिले जातील. तसेच परिमंडळ तीन केले जातील. मुख्यालय उपायुक्तांच्या कामाची विभागणी होईल, अशी शक्यता आहे.

हेही वाचलंत का?
SCROLL FOR NEXT