मराठवाडा

तुळजापूर : सोने-चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात; पहिल्या दिवशी तीन किलो सोन्याची मोजणी

Shambhuraj Pachindre

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा :  तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूची वितळवण्याची प्रक्रिया दि. सात जूनपासून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली. प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ३ किलो सोन्याचे दागिने मोजमाप करण्याचे काम करण्यात आले.

तुळजाभवानी देवीला परंपरेने भाविक सोन्या चांदीच्या वस्तू वाईक म्हणून अर्पण करतात. या सर्व अर्पण केलेल्या वस्तूंचे मोजमाप करण्याचा तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून नुकताच निर्णय घेण्यात आला होता. यासाठी मुंबई येथील सुवर्णकार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दि. ७ जून रोजी सोने-चांदीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच मुंबई येथील सुवर्णकार, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे, कदम, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्य पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो यांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही कॅमेराच्यानिगराणीखाली मोजमाप करण्याच्या कामाला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार सोन्याचांदीवाही वस्तूच्या ५० पेट्या असल्याची माहिती असून त्यातील पहिली सात जून रोजी सकाळी दहा वाजता उघडण्यात आली.

डोळे, टिळे, मनी, मंगळसूत्र, चोक, अंगठी आणि इतर छोटे-मोठे दागिने यांचा यामध्ये समावेश होता. हे मोजमाप करण्यासाठी मंदिर संस्थानकडून करण्यात आलेला ड्रेस कोड ( पॉकेट लेस ड्रेस ) कर्मचारी अधिकारी आणि मोजमाप करणाऱ्या यंत्रांनी घातला होता. या शर्ट आणि पॅन्टला एकही खिसा नव्हता.

सर्व अधिकारी कर्मचारी आणि मोजमाप करणाऱ्यांसाठी उपस्थित असणाऱ्या लोकांची आतमध्ये जाताना आणि बाहेर येताना तपासणी करण्यात आली. पहिल्या दिवशी मोजमाप करण्यात आलेल्या सर्व वस्तू सोन्याच्या असल्याचे निदर्शनास आले. मनी मंगळसूत्र यामधील काळे मणी आणि आवश्यक साहित्य वगळता मोजलेले सर्व ऐवज सोन्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्राचीन देवस्थान असणाऱ्या तुळजाभवानी देवीला भाविक श्रद्धेने आपल्या वस्तू अर्पण करतात. या वस्तूची योग्य वेळी नोंद होणे आणि त्याचा योग्य विनियोग होणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने मंदिर संस्थांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे.

– अमरराजे कदम, अध्यक्ष तुळजाभवानी पुजारी मंडळ

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT