Solapur : अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपींना बेड्या | पुढारी

Solapur : अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपींना बेड्या

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात अनैतिक संबंधाच्या कारणावरून कारमध्ये खून केल्याची घटना घडली. या प्रकरणातील दोघा संशयित सख्या भावांना करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासात बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनाही करमाळा पोलिसांनी करमाळा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भाग्यश्री भोसले यांच्यासमोर उभे केले. यावेळी दोघांना तब्बल सहा दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

सुनील शांताराम घाडगे (वय 28) व राहुल शांताराम घाडगे (वय ३०) असे कोठडी ठोठावलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे दोघेही रा. अंदरसुल ता. येवला, जि. नाशिक येथील रहिवासी आहेत. श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ३९ रा. अडसुरेगाव ता. येवला जिल्हा नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याची फिर्याद मयताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण (वय ३०) यांनी करमाळा पोलिसांत दिली होती.

अहमदनगर टेंभूर्णी महामार्गावर ५ जून रोजी सायंकाळी एका कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह स्थानिकांना आढळून आला. मांगी हद्दितील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळच्या कुकडी वितरिके परिसरात हा खून झाला होता. कारमधील काचा बंद असल्याने आग विझून गेल्याने इसमाचा मृतदेह अर्धवट जळाला होता.

मयत तरुण बेपत्ता होता

या घटनेची माहिती मिळताच, करमाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सायबर क्राईमचे पोलीस नाईक व्यंकटेश मोरे यांच्या सहाय्याने तात्काळ छडा लावत पोलिसांनी हा खूनच असल्याचा निष्कर्ष काढून मृतदेह हा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील असल्याचे शोधून काढले. ३ जून पासून मयत श्रावण चव्हाण हा बेपत्ता होता याची हरवल्याची माहिती येवला पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान मृतदेह पाच जुन रोजी सापडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरिक्षक ज्योतिराम गुजंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर, हवालदार अजित उबाळे, चंद्रकांत ढवळे, तौफिक काझी, अमोल जगताप, सिध्देश्वर लोंढे, गणेश शिंदे आदिच्या पथकाने थेट नाशिक गाठले.

अवघ्या २४ तासात सुनिल घाडगे व राहुल घाडगे या दोघा भावांना सापळा रचून बेड्या ठोकल्या. दरम्यान या खूनात अजुन किती लोकांचा सहभाग आहे? कशाच्या सहाय्याने खून केला? इत्यादी कारणांचा तपास पोलीस करत आहेत. या खूनाबाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक एम एन जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button