Zhurale Gopinath Temple pudhari photo
बीड

Zhurale Gopinath Temple : परळीतील झुरळे गोपीनाथ मंदिरातील झुरळे सात्विक, निरूपद्रवी कशी?

विज्ञान आणि अध्यात्माचा संगम, निसर्ग, गुढ सहजीवनातून बनली झुरळांची अद्भुत परिसंस्था

पुढारी वृत्तसेवा

प्रा. रवींद्र जोशी

परळी वैजनाथ : कॉकरोच जनता पार्टीमुळे परळी वैजनाथ येथील झुरळे गोपीनाथ मंदिर सध्या चर्चेचा विषय बनलेले आहे. या मंदिरात असणारी झुरळे अंगावर पडल्यावर ती व्यक्ती भाग्यवान असल्याचे समजले जाते. परंतु या मंदिरातील झुरळे ही शतकानुशतके सात्विक व निरूपद्रवी कशी? हा अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय ठरला आहे.

सामान्यतः झुरळ म्हटले की अस्वच्छता अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. या मंदिरातील झुरळांची कथा याला पूर्णपणे छेद देणारी आहे. श्रद्धा परंपरा आणि निसर्गाच्या संतुलित व्यवस्थेचा हा एक दुर्मिळ नमुना पाहण्यास मिळत आहे. देवाच्या चरणाजवळ मुक्तपणे वावरणारी ही झुरळे पाहून त्यांच्या विषयी भीती पेक्षा श्रद्धेची भावना निर्माण होते.

श्रद्धेच्या वातावरणात हा अनुभव अनेकांना विलक्षण वाटतो. केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाही तर परिसंस्था, जैविक चक्र आणि नैसर्गिक संतुलन यासारख्या संकल्पनांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा अभ्यासाचा विषय ठरू शकतो. मानवी हस्तक्षेपा शिवाय तयार झालेली ही व्यवस्था निसर्गाच्या सूक्ष्म नियमांची साक्ष देणारी ठरत आहे.

झुरळे गोपीनाथ मंदिरातील ही झुरळे पिढ्यान पिढ्या याच गाभाऱ्यात राहतात. बाहेरील गटारे कचराकुंड्या किंवा दूषित परिसराशी त्यांचा संबंध नसतो त्यामुळे त्यांचे जीवन चक्र मंदिराच्या गाभाऱ्यातील या चार भिंतीमध्येच पूर्ण होते विज्ञानाच्या भाषेत याला जैविक विलगीकरण असे म्हणता येऊ शकते. म्हणजेच एखादी जीवसृष्टी बाहेरील वातावरणापासून दीर्घकाळ वेगळी राहून स्वतःची स्वतंत्र परिसंस्था तयार करते.

मंदिरातील झुरळांची कथा अशाच एखाद्या नैसर्गिक प्रयोगाची आठवण करून देणारी ठरते. गाभाऱ्यातील अनेक फटी कपारी आणि दगडी सांधे यामध्ये त्यांचे जीवन असते. जिथे माणसाचा हात किंवा झाडू सहज पोहोचू शकत नाही, अशा दुर्गम जागा मध्ये ही झुरळे राहतात.

शतकानुशतके या झुरळांची संख्या मर्यादित कशी राहिली हा सुद्धा एक कुतुहलाचा विषय आहे. निसर्गातील प्रत्येक जीवाची संख्या उपलब्ध अन्न आणि निवाऱ्यावर अवलंबून असते. या मंदिरातील झुरळांना मिळणारे अन्न मर्यादित आहे, त्याचबरोबर मंदिराची नियमित साफसफाई होत असते यामुळे त्यांच्या संख्येवर नैसर्गिक नियंत्रण राहते.

तज्ञांच्या मते झुरळांच्या 4600 प्रजाती आहेत, त्यापैकी केवळ एक टक्के झुरळे घरात राहतात आणि त्यांच्युाळे निर्माण होणारी अस्वच्छता मानवासाठी हानिकारक असते. यामंदिरात आढळणा-या झुरळांपासून तसा धोका नाही.

पाणी, दूध, मधावर जगतात

झुरळे गोपीनाथ मंदिराचा गाभारा जमिनीपासून सुमारे दहा फूट खोल आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापुरतेच त्यांचे जीवन मर्यादित राहिल्याने त्यांच्या वर्तनातही वेगळेपणा दिसून येतो. सामान्य झुरळे विविध प्रकारच्या सेंद्रिय कचऱ्यावर जगतातात, मात्र या मंदिरातील झुरळांचे अन्न वेगळे आहे. अभिषेकासाठी वापरले जाणारे पाणी, दूध, मध तसेच प्रसादाचे सूक्ष्म कण हेच त्यांचे मुख्य खाद्य बनले आहे. या सात्विक वातावरणामुळे झुरळांमध्ये रोगराई पसरविणाऱ्या घटकांची निर्मिती होत नाही, असा तर्क मांडल्या जातो.

"परळीच्या झुरळे गोपीनाथ मंदिरात आढळणारी ही झुरळे चमकदार लालसर तपकिरी रंगाची आहेत.त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागावर फिकट पिवळ्या किंवा बदामी रंगाची गोल कडा स्पष्ट दिसते जी अमेरिकन झुरळाची मुख्य ओळख आहे. ही झुरळांची प्रजाती सहसा हानिकारक मानली जाते परंतु या मंदिरातील झुरळां कडून शतकानूशतकापासून काहीही संसर्ग अथवा हानी झालेले उदाहरण आढळत नाही. दोन तीनशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिराचा संदर्भ असल्याने हे सामान्य झुरळं नाही तर या मंदिराच्या पर्यावरण व्यवस्थेचा एक भाग बनलेली आहेत.या झुरळांची एक अद्भुत अशी परिसंस्था या ठिकाणी निर्माण झालेली असल्याने ही झुरळे निरूपद्रवी झालेली आहेत याचा सखोल अभ्यास आम्ही करणार आहोत."
प्रा. डॉ. जगदीश जगतकर, प्राचार्य तथा प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ
परळी येथील पुरातन असलेल्या झुरळे गोपीनाथ मंदिरातील झुरळे ही इतरत्र आढळणाऱ्या सामान्य झुरळांसारखी प्रजाती निश्चितच नाही. अनेक वर्षांचा कालावधी गेलेला असल्याने या ठिकाणी या झुरळांच्या अन्य झुरळांपेक्षा वेगळ्याच पिढ्या तयार झालेल्या आहेत.त्यामुळे ही एक विकसित झालेली नवीनच परिसंस्था असून प्राणीशास्त्र अभ्यासकांसाठी हे नाविन्य व दुर्मिळ उदाहरण आहे. त्यामुळे आपल्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र अभ्यासकांना व प्संशोधकांना या निरूपद्रवी झुरळ प्रजातीच्या संशोधन व अभ्यासाची ही मोठी संधी आहे.
प्रा. नाना गोडबोले, अभ्यासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT