Young man ends his life for Dhangar reservation
गेवराई, पुढारी वृत्तसेवा धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेवराई तालुक्यातील घटना मादळमोही येथील एका तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेने धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे.
योगेश बबनराव चौरे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, ते मादळमोही गावातील राहत्या घरीच पाण्याच्या जारचा प्लांट चालवत होते. कष्टाळू, जवाबदार आणि गावातील सर्वपरिचित असा हा तरुण अचानक आयुष्य संपवेल, यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान भाऊ आणि वृद्ध आई असा परिवार असून, वडील नसल्यामुळे घरातील कमावते एकमेव व्यक्ती त्यांनीच होते. त्यामुळे चौरे कुटुंबावर शोककळा दाटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथे धनगर आरक्षणासाठी सुरू असलेले आमरण उपोषण आणि बीडमध्ये नुकताच झालेला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा या घडामोडींमुळे योगेश चौरे मानसिक तणावात होते. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठलाही परिणाम होऊ नये, अशी भूमिका त्यांनी नेहमीच मांडली होती.
या ताणतणावातूनच त्यांनी गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेहाच्या नातेवाईकांनी आणि समाजबांधवांनी आक्रमक भूमिका घेत गेवराई तहसील कार्यालयासमोर मृतदेह आणून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.