यश ढाका खून प्रकरणात युवा सेना जिल्हाप्रमुखाचा सहभाग असल्याचा आरोप 
बीड

Beed Crime : यश ढाका खून प्रकरणात युवा सेना जिल्हाप्रमुखाचा सहभाग असल्याचा आरोप

यशच्या मामेभावाने दिला जवाब; गणेश शिराळे याच्यासह इतर दोघांना अटक करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीडमधील यश ढाका या तरुणाच्या खून प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या खूनामध्ये युवा सेनेचा जिल्हाप्रमुख गणेश शिराळे, निखील घोडके, कृष्णा सोनवणे यांचा सहभाग असल्याचा जवाब आकाश कंडेरे या यशच्या मामेभावाने दिला असून या आरोपींच्या अटकेसाठी बीडमध्ये रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. या प्रकरणात सुरज काटे याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बीड शहरातील बलभीमनगर भागातील रहिवाशी यश ढाका या युवकाचा माने कॉम्पलेक्स भागात सुरज काटे याच्याशी वाद झाला होता. त्याच कारणावरुन गुरुवारी रात्री सुरज काटे याने यश ढाका याच्यावर धारदार शस्त्राचे वार केले. यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी यशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरज काटे याच्यावर गुन्हा दाखल होताच त्याला अटक करण्यात आली. परंतु यश ढाका याच्या मित्राने दिलेल्या पुरवणी जवाबात आणखी काही युवकांची नावे समोर आली आहेत. त्यांनाही अटक करावी अशी मागणी ढाका याच्या नातेवाईकांनी केली. तसेच जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पावित्रा घेतला होता.

जिल्हा रुग्णालय तसेच शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव देखील जमा झाला होता. याच नातेवाईकांनी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या दरम्यानच्या रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, यशचा मामेभाऊ आकाश कंडेरे याने दिलेल्या जवाबात गणेश गोरख शिराळे, निखील घोडके व कृष्णा सोनवणे यांचाही या खून प्रकरणात समावेश असल्याचा जवाब दिला असून आता पोलिस अधिक तपास करत आहेत.

माझ्या मुलाला गोवण्याचा प्रयत्न : गोरख शिराळे

यश ढाका याच्या खून प्रकरणात माझा मुलगा गणेश शिराळे याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असून तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, त्याबाबतचे पुरावे असल्याचे निवेदन गोरख शिराळे यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे. यश ढाका याच्या खून प्रकरणात अटक असलेल्या सुरज काटे याच्यासह गणेश गोरख शिराळे व इतर काहीजणांची नावे पुरवणी जवाबाबमध्ये घेतल्याचे ऐकीव माहितीवरुन समजल्याचे गोरख शिराळे यांनी या निवेदनात म्हटले आहे. गणेश शिराळे हा २५ सप्टेंबर रोजी विविध मंडळांच्या आरतीसाठी उपस्थित होता. खूनाची घटना घडली त्यावेळी तो डीपी रोड भागात उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा देखील गोरख शिराळे यांनी निवेदनात केला आहे.

प्रकरणाला राजकीय वळण

या प्रकरणात गोरख शिराळे यांचा मुलगा गणेश शिराळे याचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा गणेश शिराळे युवा सेनेचा जिल्हा प्रमुख असून त्याचे नाव पुढे आल्याने आता या प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. तसेच त्याच्यासह इतर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी यश ढाका याच्या नातेवाईकांकडून देखील दबाव वाढत आहे.

मुलीशी बोलण्याच्या कारणातून खून

यश ढाका याचा खून करणारा गणेश शिराळे, निखील घोडके व कृष्णा सोनवणे यांनी तु माझ्याशी बोलणाऱ्या मुलीशी का बोलतो? या कारणावरुन कट करुन खून केलेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास करुन सर्व आरोपींची खात्री करुन अटक करावी, असे देखील आकाश कंडेरे याने जवाबात म्हटले आहे. तसेच मागील दोन महिन्यांपासून ही सर्व मुले यश ढाका याला त्रास देत होती. त्याने एकदा याबाबतचा उल्लेख देखील केला होता. परंतु ही सर्व मुले गुंड प्रवृत्तीची असल्याने आम्ही त्याला या सर्व गोष्टीपासून दूर रहा म्हणत आम्ही भितीपोटी तक्रार दिली नव्हती, असे देखील आकाश कंडेरे याने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT