Women's marathon : बीडमध्ये महिला मॅरेथॉन उत्साहात file photo
बीड

Women's marathon : बीडमध्ये महिला मॅरेथॉन उत्साहात

जागतिक महिला दिनानिमित्त तुलसी शैक्षणिक समूहाचा उपक्रम; विजेत्यांना बक्षीस वितरण

पुढारी वृत्तसेवा

Women's marathon in Beed with excitement

बीड, पुढारी वृत्तसेवा जागतिक महिला दिनानिमित्त तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'महिला मॅरेथॉन' स्पर्धा रविवार दि.८ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत शालेय विद्यार्थिनींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्व वयोगटातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्यजागृती आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.

महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जात पडताळणी विभागाचे सहाय्यक उपायुक्त उमेश सोनवणे तसेच तुलसी शैक्षणिक समूहाचे संचालक प्रा. प्रदीप रोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महिला दिनानिमित्त मॅरेथॉनसारख्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, विविध ठिकाणी आयोजित मॅरेथॉनमध्ये महिलांचा सहभाग तुलनेने कमी असतो, मात्र बीडमध्ये शंभर टक्के महिलांचा सहभाग दिसून येणे ही अभिमानाची बाब आहे.

तसेच त्यांनी बीड जिल्ह्यातील बालविवाह आणि मुलींच्या शिक्षणातील गळतीच्या प्रश्रा वरही प्रकाश टाकत समाजाने याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. अशा स्पर्धांमधून महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो, असे त्यांनी नमूद केले.

सकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. नगर रोड मार्गे पुन्हा सामाजिक न्याय भवन असा सुमारे ७कि.मी. चा मार्ग स्पर्धकांनी उत्साहाने पार केला.

१० ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील अशा दोन गटांत ही स्पर्धा पार पडली. दोन्ही गटांत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. स्पर्धेच्या शेवटी विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये गट-अ (१० ते १८ वर्षे) या गटात कु. दिव्या राठोड हिने २९ मिनिटांत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. तिला १५,००० रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक कु. अमृता वायकर तर तृतीय क्रमांक कु. अक्षरा शेलार यांनी मिळवला. त्यांना अनुक्रमे १०,००० व ७,००० रुपये रोख पारितोषिकांसह सन्मानित करण्यात आले.

गट-ब (१८ वर्षावरील) या गटात परिमला बाबर हिने ३२ मिनिटांत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला. तिला १५,००० रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी गुजर, तर तृतीय क्रमांक कांचन शिंदे यांनी मिळवला. त्यांनाही अनुक्रमे १०,००० व ७,००० रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, योगा ग्रुप, बालाघाट ग्रुप, तसेच तुलसी शैक्षणिक समूहातील विविध युनिटचे प्राचार्य डॉ. विजयकुमार बांदल, प्रा.डी.डी. राऊत, प्रा.डी.जी निकाळजे, डॉ. सुनील जोंधळे, प्रा. प्रकाश ढोकणे, उमा जगतकर, डॉ. अश्विनी बेद्रे यांच्यासह शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मॅरेथॉनला शहरातील नागरिक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT