भूम तालुक्यातील सुकटा शिवारात पवनचक्की कंपनीकडून सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननाविरोधात आवाज उठवणारे माजी सरपंच बजरंग गोयकर यांना गावगुंडांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, (ता.५) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोयकर हे भूमकडे येत असताना, पाच जणांनी त्यांना रस्त्यात अडवून मारवाड, स्टम्पसह विविध साहित्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बार्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मारहाणीनंतर गोयकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी शेतकऱ्यांसाठी सतत लढा देत असल्यामुळे पवनचक्की माफियाकडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केले गेले. हल्लेखोरांनी मला जीव घेण्याची धमकीही दिली.”
या घटनेची माहिती मिळताच भूम पोलीस निरीक्षक व बीट आमलदार यांनी बार्शी रुग्णालयात भेट दिली.
मात्र, घटनेनंतरही अद्याप कोणताही गुन्हा नोंदवला गेला नसल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भूम-वाशी तालुक्यात पवनचक्की माफियाकडून वारंवार शेतकऱ्यांवर आणि माजी सरपंचांवर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. परंतु पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने माफियांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे.
शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनासारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने पवनचक्की माफियावर कठोर कारवाई करावी. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.