आता बीडचा 'पालक' कोण होणार? file photo
बीड

आता बीडचा 'पालक' कोण होणार?

सुनेत्रा पवार यांनीच जबाबदारी स्वीकारण्याची होतेय मागणी

पुढारी वृत्तसेवा

Who will be the 'guardian' of Beed now?

उदय नागरगोजे

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बीडच्या पालकमंत्रीपदी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीच पालकमंत्रीपद स्विकारावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

राज्यात महायुती सत्तेत बीडच्या पालकमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला आल्यानंतर होता. मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये याकरिता एक मोठा गट कामाला लागला होता, यातूनच मग थेट देवेंद्र फ डणवीस यांनीच पालकमंत्रीपद स्विकारावे अशी मागणी केली जात होती. परंतु बीडचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या कोट्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पद स्विकारले होते. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री असलेल्या व विकासाची जाण असलेले नेतृत्व बीडचे पालकमंत्री झाल्याने बीडच्या विकासाची गती वाढली होती.

यामध्ये अगदी रेल्वे, विमानतळाबरोबरच कौशल्यविकास केंद्र, तारांगण, नाट्यगृह या बरोबरच विविध रस्त्यांसाठी देखील गत काही काळात मोठा निधी मंजूर करण्यात आला होता. अजित पवार यांचा विकासकामांच्या दर्जाबाबतही मोठा आग्रह असायचा, यामुळे बीडचा दर्जेदार विकास होणार, अशी अपेक्षा बीडकरांना होती, त्या दिशेने वाटचाल देखील सुरु होती.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीबरोबरच भाजपा, शिवसेनेचे पदाधिकारी व विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार, खासदारांना सोबत घेतले होते. यामुळे बीडमधील विकासकामांत सर्वाचाच सहभाग होता. दादांचे नेतृत्व अगदी विरोधी पक्षातील आ. क्षीरसागर व खा. बजरंग सोनवणे यांनीही मान्य केल्यासारखेच होते.

अजित पवार यांनी मंजूर केलेल्या निधीबद्दल आ. क्षीरसागर यांनी होडींग्ज लावत आभार मानले होते तर खा. सोनवणे यांनी देखील नुकताच दादांसोबत हवाई प्रवास केला होता, तसेच आगामी दोन महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत देखील खा. सोनवणे यांनी भाषणातून दिल्या होत्या. परंतु या दरम्यानच अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने आता बीडच्या पालकमंत्रीपद कोणाची वर्णी लागणार, याकडे बीडकरांचे लक्ष आहे.

अजितदादांनी माझ्यावर बीडकरांचा मोठा विश्वास आहे, त्यांचा भ्रमनिरास मी होऊ देणार नाही असे म्हणत विकासकामांचा धडाका लावला होता, त्यांच्या पश्चात ही विकासाची गती कायम रहावी याकरिता सुनेत्राताई पवार यांनीच पालकमंत्रीपद स्विकारावे अशी मागणी पुढे येत आहे. अजित पवार यांच्यानंतर आता बीडचे पालक कोण होणार आणि बीडमधील विकासाबरोबरच सामाजिक समतोल साधण्याचे शिवधनुष्य कोण पेलणार, हे येत्या काही काळात स्पष्ट होऊ शकणार आहे.

पालकमंत्रिपद भाजपाकडे जाणार?

बीडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्याने ही जबाबदारी स्वतः अजित पवार यांनी स्विकारली होती. या पालकमंत्रीपदाचा बीडमध्ये राष्ट्रवादीचे संघटन मजबुत करण्यासाठीही मोठा फायदा झाला. भाजपासह इतर पक्षात असलेल्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता. परंतु आता बीडचे पालकमंत्रीपद भाजपाकडे जाऊन पालकमंत्रीपदाची जबाबदारी पंकजा मुंडे स्विकारणार असल्याची देखील चर्चा होऊ लागली असून याबाबतचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्रीच घेतील असे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT