अधिक मासापूर्वी लग्नसराईची धामधूम जोरात Pudhari
बीड

Wedding season : अधिक मासापूर्वी लग्नसराईची धामधूम जोरात

कडाक्याच्या उन्हातही वऱ्हाडींची लगबग, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

पुढारी वृत्तसेवा

शरद रेडेकर

आष्टी ः अधिक मास जवळ येत असल्याने विवाहासाठी उपलब्ध असलेल्या मुहूर्तांचा अखेरचा टप्पा सुरू झाला असून 14 मेपर्यंत तालुक्यातील सर्व मंगल कार्यालये अक्षरशः हाऊसफुल झाली आहेत. दररोज मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळे पार पडत असून कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता वधू-वर पक्ष, नातेवाईक आणि पाहुण्यांची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे.

पूर्वी लग्न म्हणजे देव-ब्राह्मणांच्या साक्षीने पार पडणारे साधे, पवित्र आणि कौटुंबिक शुभकार्य मानले जात होते. मात्र बदलत्या काळानुसार विवाह सोहळ्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून आजचे लग्न हे केवळ धार्मिक विधी न राहता भव्यदिव्य ‌‘इव्हेंट‌’ बनले आहे. आकर्षक स्टेज डेकोरेशन, प्री-वेडिंग शूट, ड्रोन फोटोग्राफी, लाईव्ह व्हिडिओ कव्हरेज, डीजे, बँड, थीमवर आधारित सजावट आणि विविध प्रकारचे स्वागत समारंभ यामुळे लग्नसोहळ्याला नव्या झगमगाटाची जोड मिळाली आहे.

लग्नसराईमुळे बाजारपेठेला मोठी आर्थिक चालना मिळाली आहे. सोन्या-चांदीचे दागिने, कपडे, साड्या, सूट-बूट, सौंदर्य प्रसाधने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, केटरिंग साहित्य, फुलांची सजावट, वाहन भाडे, डीजे आणि फोटोग्राफी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, या हंगामात बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून अनेक व्यावसायिकांना वर्षातील सर्वाधिक व्यवसाय याच काळात मिळत आहे.

एकाच दिवशी अनेक विवाह सोहळे असल्याने विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी धावपळ सुरू आहे. प्रत्येक लग्नसमारंभाला उपस्थित राहून शुभेच्छा देण्यासाठी पुढाऱ्यांना अक्षरशः वेळापत्रक तयार करावे लागत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विवाहस्थळांवर त्यांची लगबग दिसून येत आहे.

मे महिन्यातील प्रचंड उकाडा आणि तापमानाचा चढता पारा याची पर्वा न करता विवाह सोहळ्यांचा उत्साह मात्र कमी झालेला दिसत नाही. वधू-वरांसह सर्व पाहुणे आनंदाने सोहळ्यात सहभागी होत असून मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि लॉन्समध्ये दिवसभर गजबजलेले वातावरण पाहायला मिळत आहे.

मुहूर्त नावापुरते, सोहळा मात्र भव्य

पूर्वी पंचांगातील मुहूर्ताला अत्यंत महत्त्व दिले जात असे. आजही धार्मिक विधी पार पडतात; मात्र प्रत्यक्षात विवाह सोहळ्याचे नियोजन, सजावट आणि पाहुणचार यालाच अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे ‌‘मुहूर्त नावापुरता आणि सोहळा भव्यदिव्य‌’ अशीच सध्याच्या विवाहसंस्कृतीची ओळख बनली आहे.अधिक मास सुरू होण्यापूर्वीचा हा अखेरचा विवाह हंगाम असल्याने ग्रामीण आणि शहरी भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT