Water scarcity : परळी तालुक्यात पाणी टंचाईचे संकट; वाण धरणावर २४ तास पहारा file photo
बीड

Water scarcity : परळी तालुक्यात पाणी टंचाईचे संकट

उपयुक्त साठा २० टक्क्यांच्या आत; अवैध उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची नजर

पुढारी वृत्तसेवा

Water scarcity crisis in Parli Taluka; 24-hour guard at Van Dam

परळी, पुढारी वृत्तसेवाः दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब आता जपण्याची वेळ आली आहे. परळी तालुक्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असून, तीन जलसाठ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा दहा टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे.

परळी शहरासह तालुक्यातील सुमारे १५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पातही आता केवळ १९.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची चिंता गडद झाली आहे. उपलब्ध जलसाठा आणखी कमी होऊ नये आणि पाण्याचा अनधिकृत उपसा रोखला जावा, यासाठी प्रशासनाने वाण धरणावर २४ तास पहारा तैनात केला आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना उपलब्ध जलसाठ्याचे संरक्षण हा प्रशासनासमोरील सर्वांत मोठा प्रश्न बनला आहे. वाण धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून वाण प्रकल्पाच्या जलसाठ्यावर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

वाण मध्यम प्रकल्पाची एकूण क्षमता सुमारे १९.७१ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, सध्याचा उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत आला आहे. हा जलस्रोत परळी शहराबरोबरच तालुक्यातील सुमारे १५ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे वाण मधील पाणीसाठा आणखी खालावल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर होण्याची शक्यता आहे.

वाण धरणातील उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत आला आहे. परळी शहरासह तालुक्यातील सुमारे १५ गावांचा पाणीपुरवठा या जलस्रोत यावर अवलंबून आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उपाययोजना सुरू आहेत. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये २४ तास पथके तैनात करण्यात आली आहेत.
विनोद रणवरे तहसीलदार, परळी वैजनाथ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT