Beed drug seizure pudhari photo
बीड

Beed drug seizure : हरिश्चंद्र पिंपरीत ४७ लाखांचा गांजा जप्त

वडवणी पोलिसांची गुप्त माहितीवरून कारवाई; १६८ किलो गांजा, १३६ झाडे जप्त; एक ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

वडवणी : अमली पदार्थांविरोधात वडवणी पोलिसांनी मोठी कारवाई करत हरिश्चंद्र पिंपरी येथे तब्बल 1 क्विंटल 68 किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे बाजारातील किंमत 47 लाख 4 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तालुक्यात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हरिश्चंद्र पिंपरी येथील गट क्रमांक 158 मधील शेतात उसाच्या शेजारी गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती वडवणी पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी पहाटे सुमारे सहा वाजता शेतावर छापा टाकला. पाहणीदरम्यान 136 गांजाची झाडे आढळून आली. तलाठी यांच्या समक्ष पंचनामा करून पोलिसांनी संपूर्ण गांजा जप्त केला. वजन केल्यानंतर त्याचे एकूण वजन 168 किलो भरले.

या प्रकरणी पोलिसांनी संदिपान विठ्ठलराव शिंदे (रा. हरिश्चंद्र पिंपरी, ता. वडवणी) याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित शेतात गांजाची लागवड केल्याचे त्याने मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केवळ स्वतःच्या वापरासाठी केली होती की त्यामागे विक्रीचे रॅकेट आहे, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

ग्रामीण भागातील शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांची अवैध लागवड व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.पोलिस उपनिरीक्षक श्याम गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे करीत आहेत.

पथकाचे कौतुक

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक अंत्रे, सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलिस उपनिरीक्षक श्याम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक फौजदार उबाळे, पोलिस हवालदार अशोक नामदास, भास्कर राऊत, जावळे, पोलिस अंमलदार हनुमंत कप्पे, बिभीषण मुंजाळ, नितीन काकडे, वसंत करे, संदीप मोरे, राम शिनगारे तसेच होमगार्ड विजय शिंदे, वाघमारे, कस्बे, समाधान सोनवणे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.वडवणी पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत असून अमली पदार्थांची अवैध लागवड आणि विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT