

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन पिंपळगाव रेणुकाई ते धावडा या प्रमुख रस्त्याच्या डागडुजीच्या नावाखाली केवळ तात्पुरती मुरूमपट्टी करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे वाहनचालक आणि नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हा रस्ता खड्डेमय झाला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर जीएसबी म्हणजेच ग्रॅन्युलर सब-बेस टाकून डागडुजी करणार असल्याचे सांगितले.
मात्र प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचा मुरूम आणि माती टाकून केवळ देखावा करण्यात आला. पहिल्याच पावसात ही मुरमपट्टी वाहून जाऊ शकतो रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण होईल.
या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच शेतीमाल घेऊन जाणारी वाहने ये-जा करतात. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
वारंवार गाड्या पंक्चर होणे, सस्पेन्शन तुटणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. वरिष्ठांनी लक्ष घालून डागडुजी गुणवत्तापूर्ण करण्याची मागणी केली.
२ दिवसांत रस्ता उखडला
स्थानिक वाहनचालक म्हणतात, "टॅक्स भरतोय पण रस्ता नाही. जीएसबीचं काम म्हटलं आणि दोन दिवसांतच सगळं निघून गेलं तर. जबाबदार अधिकारी फक्त पाहणी करून जातात, काम काही होत नाही." रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.