वडवणी : वडवणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात शुक्रवारी सायंकाळी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे काही वेळातच तुफान दगडफेक आणि हाणामारीत रूपांतर झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेत अनेक तरुण जखमी झाले असून काही वाहनांचे व मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी वडवणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच आरोपींना तत्काळ अटक करून मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हजारोंच्या उपस्थितीत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
वडवणी शहरातील श्रीराम मंदिर परिसरातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. हातात भगवे झेंडे, आणि घोषणाबाजी करत हजारो युवक, व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. दोषींना अटक झालीच पाहिजे, वडवणीत गुंडगिरी चालणार नाही, मुख्य आरोपीवर मकोका लावा, अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचला. तेथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका कपड्यांच्या दुकानासमोर वाहन पार्किंगवरून दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र काही वेळातच दोन्ही गटातील तरुण आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद केली.
काही वेळातच संपूर्ण व्यापारी पेठ बंद झाली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप केला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
आरोपींना त्वरित अटक करून कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली. बंदला व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घटनेच्या निषेधार्थ शनिवारी वडवणी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्य बाजार पेठेसह शहरातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद होती.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोर्चा आणि बंदच्या पार्श्वभूमीवर वडवणी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीड येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. शहरातील संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली होती.
दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींचा तत्काळ शोध घ्या
मोर्चाच्या समारोपानंतर झालेल्या सभेत विविध मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. घटनेतील मुख्य आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दगडफेक आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या इतर आरोपींचाही शोध घेऊन कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मान्यवरांची भाषणे : यावेळी आयुष्यमान भारत मिशनचे राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, हिंदू जागरण प्रांत संयोजक अंबादास अंभोरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व स्थानिक मान्यवरांनी नागरिकांना संबोधित केले. वक्त्यांनी सांगितले की, वडवणी ही शांतताप्रिय नगरी आहे. येथे अशा प्रकारच्या हिंसक घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. समाजातील शांतता भंग करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने दोषींना पाठीशी न घालता निष्पक्ष तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.