NCP Sharad Pawar office fire pudhari photo
बीड

Beed crime : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संपर्क कार्यालय पेटवले; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या वैमनस्यातून कार्यालय पेटवून दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

वडवणी : वडवणी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तालुकाध्यक्ष महादेव जमाले यांच्या जनसंपर्क कार्यालयाला मध्यरात्री संशयास्पदरीत्या आग लावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे, संगणकासह कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले असून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी जुन्या वैमनस्यातून कार्यालय पेटवून दिल्याचा आरोप करत मोहनसिंग टाक याच्याविरुद्ध वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, एसबीआय बँकेसमोरील हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविणे, पक्षाचे उपक्रम राबविणे तसेच विविध प्रशासकीय व बँकिंग व्यवहारांसाठी वापरले जात होते. यापूर्वी मोहनसिंग टाक व त्याच्या भावंडांविरुद्ध वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपीच्या आईने फिर्यादीच्या घरी येऊन, "माझ्या मुलांवर तुमच्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

माझ्या मुलाने तुम्हाला काही केले तर त्याची जबाबदारी माझी राहणार नाही," असा इशारा दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.१९ जुलै रोजी रात्री साडेआठपर्यंत फिर्यादी आणि त्यांचा भाऊ कार्यालयात होते. त्यानंतर कार्यालय बंद करून ते घरी गेले. दरम्यान, २० जुलै रोजी पहाटे सुमारे अडीच वाजता मोरया मेडिकलमधील अमर खरात यांनी कार्यालयाला आग लागल्याची माहिती दूरध्वनीवर दिली.

घटनेची माहिती मिळताच फिर्यादी घटनास्थळी पोहोचले. नगराध्यक्षांचे पती शेषराव जगताप यांच्या माध्यमातून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले होते. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर कार्यालयात पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाचा तीव्र वास येत असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

या आगीत शेती व प्लॉटची मूळ कागदपत्रे, ट्रॅक्टर व जेसीबीची कागदपत्रे, बँक पासबुक, चेकबुक, दैनंदिन व्यवहाराची कागदपत्रे, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, सीसीटीव्ही यंत्रणा, सोफा, टेबल, खुर्च्या तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. जुन्या वादातून आरोपीने पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून कार्यालयाला आग लावल्याचा आरोप फिर्यादीने केला असून, त्यांच्या तक्रारीवरून मोहनसिंग टाक याच्याविरुद्ध वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा पुढील तपास वडवणी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT